दीप्तीच्या जागी सदरलँड अग्रस्थानी
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसी महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या दीप्ती शर्माने आपले अग्रस्थान गमविले. तर फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची कर्णधार हरमनप्रित कौरने 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. कौरचे स्थान दोन अंकांनी वधारले आहे.
लंकेविरुद्ध झालेल्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात हरमनप्रित कौरने 43 चेंडूत 68 धावांची खेळी करत सामनावीराचा बहुमान मिळविला. भारतीय महिला संघाने हा सामना 15 धावांनी जिंकला होता. फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी अनुक्रमे आपले तिसरे आणि सहावे स्थान कायम राखले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी अग्रस्थानावर आहे. भारताच्या जेमिमा रॉड्रिग्जला पहिल्या 10 फलंदाजांमधील आपले स्थान गमवावे लागले. आता ती या यादीत 12 व्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत यापूर्वी भारताच्या दीप्ती शर्माने अग्रस्थान मिळविले होते. पण आता तिला हे स्थान गमवावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँड अग्रस्थानावर आहे. सदरलँड 736 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर असून दीप्ती शर्माने 735 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या श्री चरणीने या गोलंदाजांच्या मानांकन यादीत 47 वे स्थान मिळविले असून लंकेची कविशा दिलहारी 32 व्या स्थानावर तर लंकेची कर्णधार चमारी अट्टापटू 48 व्या स्थानावर आहे.