चाकूने भोसकून खून केलेल्या सुतगट्टीच्या सख्ख्या भावांना अटक
आट्यापाट्या खेळताना वादावादीनंतरची घटना
बेळगाव : आट्यापाट्या खेळताना झालेल्या वादावादीनंतर चाकूने भोसकून एका अठरा वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला होता. सौंदत्ती तालुक्यातील सुतगट्टी येथे ही घटना घडली होती. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे. बसवराज सोमलिंग पेंटेद (वय 19), त्याचा भाऊ राघवेंद्र सोमलिंग पेंटेद (वय 18) दोघेही राहणार सुतगट्टी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक धर्माकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. क्षुल्लक कारणावरून खुनाचा प्रकार घडला होता. दि. 30 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सुतगट्टी येथील हुलीआज्जा मंदिराजवळ गावातील तरुण आट्यापाट्या खेळताना वेंकटेश ऊर्फ मुत्तू सुरेश दळवाई (वय 18) व राघवेंद्र पेंटेद यांच्यात भांडण झाले. भांडणानंतर बटण चाकूने भोसकून वेंकटेशचा खून करण्यात आला आहे.