संशयी नासला पुरा
अध्याय चौथा
भगवंत म्हणाले, श्रद्धावान, इंद्रिय जिंकलेल्या, ज्ञानसाधनेत तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे त्याला परमशांती लाभते. आत्मज्ञान मिळवण्यासाठी सद्गुरूंच्या आश्रयाला जावं. एकदा आत्मसुखाची अमृतमधुर गोडी निर्माण झाली, की ज्याप्रमाणे लहानपणीची खेळणी समोर दिसत असली तरी हवीशी वाटत नाहीत त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या अवीट गोडीपुढे दृश्य जगातल्या सुखांचे आकर्षण वाटत नाही. आपण सुचवत असलेल्या विषयांना माणसाचे मन दाद देत नाही, हे पाहून ज्ञानेंद्रियांचा नाईलाज होतो आणि ती स्वस्थ बसतात.
भगवंताच्या सांगण्यावरून लक्षात येते की, जीवनात स्वत:चा उद्धार करून घेण्याच्या दृष्टीने आत्मज्ञान प्राप्त करून घेणे हेच मुख्य उद्दिष्ट असायला हवे. जो जीवनात आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची टाळाटाळ करतो किंवा आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्यावर आपला उद्धार होईल ह्या श्रीहरिच्या सांगण्यावर ज्याची श्रद्धा नसते असा अज्ञानी, अश्रद्ध, संशयी मनुष्य नाश पावतो. ह्या अर्थाचा
नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा । न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ।। 40 ।।
श्लोक आपण सध्या पहात आहोत. त्यानुसार भगवंत म्हणतात, मी म्हणजे हे शरीर आणि समोरची दुनिया खरी आहे ह्या भ्रमात संशयी वावरत असल्यामुळे त्याचे जीवन दिशाहीन होते. आत्मज्ञानाची मनात इच्छा निर्माण झाली, तर ते ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते. ज्या प्राण्याच्या अंत:करणात अध्यात्माची आवड नाही, त्याचे संपूर्ण जीवन वाया जाते.
माउली पुढे म्हणतात, ज्याला आत्मज्ञानाचे महत्त्व समजलेले नसते. त्याला त्याविषयी श्रद्धा नसते. त्यामुळे तो आपले अज्ञान दूर होऊन आत्मज्ञान प्रकट व्हावे अशी इच्छा बाळगत नाही. ह्याने आपले भले कसे होईल अशी शंका त्याला येत असते. असा मनुष्य संशयरुपी अग्नीमध्ये पडला, असे समज. आत्मज्ञानाची तुलना अमृताबरोबर करून ते पुढे म्हणतात, एखाद्याला अमृतही आवडेनासे होते, त्यावेळी त्याचा विनाश निश्चित असतो. त्याप्रमाणे विषयसुखात रंगून गेल्याने ज्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावेसे वाटत नाही तो पुस्तकी ज्ञानाने उन्मत्त झाल्याने संशयाच्या चक्रात सापडतो.
काही लोकांना नशिबाने उत्तम आर्थिक परिस्थिती लाभलेली असते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात विषयसुख उपभोगायला मिळत असते. श्रीमंत असल्याने समाज त्यांच्या सर्व कृत्यांना मान्यता देतो. तसेच काही लोकांना बुद्धीची देणगी मिळालेली असल्याने ते शाळा कॉलेजातील शिक्षण घेतात. त्यातील अत्युच्च पदवी मिळवतात. त्याआधारे त्यांना उत्तम पॅकेजची नोकरी व जीवनातील सुखसुविधा प्राप्त होतात. जीवनात असा मनुष्य अत्यंत यशस्वी झाला आहे, असे समाजाला वाटते. काही लोक उद्योगधंद्यात उत्तम यश मिळवतात त्यांनाही समाजात गौरवाचे स्थान मिळते. एकूण अशा सर्वांचे आयुष्य उत्तम घडले ते यशस्वी जीवन जगले अशी समाजमान्यता असते. यापैकी बहुतेकजण आता आपण जिंकलं ह्या आनंदात असतात. काहींना तर त्यांच्या यशाचा कैफ चढतो त्या नादात ते इतरांना तुच्छ लेखतात. तसेच त्यांना अध्यात्म, तत्वज्ञान, भाव, भक्ती इत्यादि गोष्टी व्यर्थ वाटू लागतात. त्यांना त्यात सांगितलेल्या उपदेशाच्या गोष्टींबद्दल शंका येऊ लागते. स्वत:च्या लौकिक ज्ञानापुढे तसेच मिळवलेल्या यशामुळे आपण आध्यात्मिक विषयाबाबत घेत असलेल्या शंका कशा बरोबर आहेत ह्याचे समर्थन ते करत असतात आणि त्यामुळे त्यांनी काढलेल्या शंकांच्या चक्रव्युहात तेच अडकतात.
क्रमश: