हणजूण पार्टीत इंदोरच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू
अमलीपदार्थाचा ओव्हर डोस झाल्याची शक्यता : पोलिसांकडून कसून चौकशी, गोव्याचे नाव पुन्हा चर्चेत
त.भा. । प्रतिनिधी
म्हापसा :
गोव्यातील किनारपट्टी भागातील पार्ट्या आणि त्यातील अनपेक्षित घटनांचे सत्र सध्या सुरूच आहे. हणजूण येथे शुक्रवारी रात्री उशिरा आयोजित एका पार्टीत इंदोर (मध्यप्रदेश) येथील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा मृत्यू संशयास्पद मानला जात असून प्राथमिक तपासात अमलीपदार्थाच्या ओव्हरडोसचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर युवक आपल्या मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्यात आला होता. शुक्रवारी रात्री हणजूण येथील एका प्रसिद्ध ठिकाणी पार्टी सुरू असताना अचानक या तऊणाची तब्येत खालावली. तो बेशुद्ध पडल्याने मित्रमंडळींमध्ये एकच घबराट पसरली. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप गूढ कायम आहे. मात्र पार्टीतील वातावरण आणि प्राथमिक लक्षणे पाहता अमलीपदार्थाच्या अतिसेवनामुळे त्याचा बळी गेला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (जीएमसी) पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. हणजूण पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पार्टीचे आयोजक आणि मृत तऊणाच्या मित्रांची सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, हणजूण परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
खासगी रुग्णालयांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या दोन ते तीन खासगी इस्पितळांमध्ये नेले. मात्र संबंधित इस्पितळांनी या तऊणाची गंभीर अवस्था पाहून त्याला दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला. ‘प्रकृती आमच्या नियंत्रणाबाहेर आहे’ असे सांगून त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. उपचारासाठी एका इस्पितळातून दुसऱ्या इस्पितळात फिरवण्यात आल्यामुळे वेळ वाया गेल्याचे समजते. अखेर एका खासगी ऊग्णालयाने त्याला दाखल करून घेतले परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी
तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
अमलीपदार्थ सेवनाने मृत्यू झाल्यास कठोर पावले उचलली जाणार : मायकल लोबो
इंदोर येथील 21 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला. याविषयी बोलताना आमदार मायकल लोबो म्हणाले की, आपण पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्याकडे फोनवरून संपर्क साधून माहिती जाणून घेतली आहे. निरीक्षकांनी सांगितले आहे की, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. शवचिकित्सा अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. हा मृत्यू कोणत्याही अमली पदार्थाच्या सेवनामुळे झाला असल्यास त्यावर कारवाई होणार आहे. हृदयविकाराच्या झटक्याने आता अनेक युवक दगावत आहेत. परंतु संशयास्पद मृत्यू झाल्यास याबाबत कठोर पावले उचलली जातील, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी आपली प्रतिक्रिया देताना व्यक्त केली.
क्लब धोरण गोव्यात आणणे गरजेचे : आमदार डिलायला लोबो
हणजूण पार्टीत 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. हणजूण गाव शिवोली मतदारसंघात येतो. आपण पोलिस निरीक्षकांना फोन करून स्पष्ट सांगितले आहे की, यावर कठोर कारवाई व्हावी. जर हा युवक अमलीपदार्थामुळे मरण पावल्यास पोलिसांनी याची कसून चौकशी करावी. असे घडल्यास गोव्याचे नाव बदनाम होते. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे व असे प्रकार पुन्हा घडू नयेत याकडे लक्ष द्यावे. आमच्या गोव्यात क्लब धोरण नसल्याने सगळे बार अॅण्ड रेस्टॉरंटवाले परवाने घेतात व क्लब चालवतात. आमच्या शेजारच्या गावात क्लब धोरण आहे, हे गोव्यात आणणे गरजेचे आहे, असे आमदार डिलायला लोबो म्हणाल्या.
‘त्या’ तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने
दरम्यान, त्या 21 वर्षीय इंदोरच्या तरुणाचा झालेला मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती गोमेकॉतील सूत्रांनी दिल्याचे म्हटले आहे, रात्री उशिरा आमदार मायकल लोबो यांनी माहिती दिली. पोलिसांनी त्यास दुजोरा दिल्याचे म्हटले आहे. याबाबत गोमेकॉतून रितसर माहिती देण्यात येईल, असे लोबो यांनी स्पष्ट केले, त्यामुळे या प्रकरणावर पूर्णविराम पडणार असल्याचे लोबो म्हणाले.