Kolhapur News | ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील अपार्टमेंटमध्ये वृद्धेचा संशयास्पद मृत्यू
शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये ६९ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला
कोल्हापूर - ऋणमुक्तेश्वर मंदिराजजीक शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये सोमवारी (दि. १६) सकाळी १० च्या सुमारास वृद्ध महिलेचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळला. उषा मारुती भिऊंगडे (वय ६९) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या खून झाल्याची अफवा परिसरात पसरली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
रात्री उशिरा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर भिऊंगडे यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा भिऊंगडे यांच्या पतीचे डिसेंबर २०२५ मध्ये निधन झाले. त्या एकट्याच गंगावेशीतील त्यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. फुलेवाडी रिंगरोड येथे राहणारा त्यांचा पुतण्या परशुराम भिऊंगडे हा रोज त्यांना भेटून जात होता. प्रकृती बरी नसल्याने तो रविवारी रात्री त्यांना औषधे देऊन गेला होता. सोमवारी सकाळी तो कामानिमित्त बाहेरगावी गेला होता.
सकाळी दहाच्या सुमारास त्याने चुलतीच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र, त्या फोन उचलत नसल्याने शेजाऱ्यांना फोन करून त्यांची चौकशी करण्याची विनंती केली. त्यावेळी शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यांनी याची माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यास दिली. पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण फ्लॅटची आणि मृतदेहाची पाहणी केली. वृद्धेच्या अंगावर कुठेही जखमा नव्हत्या, तसेच घटनास्थळी कोणत्याही झटापटीच्या खुणा आढळल्या नाहीत. याचसोबत तिजोरीतील रोकड व दागिने सुरक्षित असल्याचे पोलिसांना आढळले.