जमिनीच्या वादातून मोरजीत संशयास्पद मृत्यू
बिगरगोमंतकीयांनी खून केल्याचा संशय : वरचावाडा - मोरजी येथे भरदुपारची घटना,मयत खोत यांचा डोंगरफोडीला होता विरोध,विश्वासात न घेता जमीन विकल्याचा दावा,मोरजीसह संपूर्ण गोव्यात माजली खळबळ
मोरजी : वरचावाडा मोरजी येथील उमाकांत खोत या 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जमिनीच्या वादातून बिगरगोमंतकीयांकडून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी तपास चालू असल्याचे सांगून आरोपींना लवकरच पकडले जाईल. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले. वरचावाडा मोरजी येथील श्रीसत्पुऊष मंदिराच्या मागे भर दुपारी ही घटना घडल्यानंतर गावात सर्वत्र खळबळ माजली. सायंकाळपर्यंत या घटनेमुळे गोव्यात सर्वत्र खळबळ माजली. अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक सलीम शेख, निरीक्षक गिरेन्द्र नाईक रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते. मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा घटनास्थळी होता.
जाब विचारताना केली मारहाण
काल बुधवारी 5 रोजी दुपारी दीड वाजता उमाकांत खोत हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतजमिनीची पाहणी करण्यासाठी जात होते. त्यांच्या जमिनीत जेसीबीद्वारे बेकायदेशीर डोंगरकापणी चालू असल्याची तक्रार त्यांनी अनेकवेळा नगरनियोजन विभागाकडे केली होती. काल बुधवारी ते याविषयी जाब विचारण्यासाठी घटनास्थळी गेले होते, तेव्हाच त्यांना मारहाण झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
...तोपर्यंत मृतदेह स्वीकरणार नाही
उमाकांत खोत हे घटनास्थळी जाऊन जाब विचारत असताना त्यांना बिगर गोमंतकीयांनी मारहाण केल्याचा दावा खोत यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याचबरोबर जोपर्यंत आरोपींना पकडले जात नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, असा इशाराही त्यांच्या नातेवाईकांनी दिला आहे.
मांद्रे पोलिसांनी डोंगरफोडीच्या ठिकाणी काम करणाऱ्या 14 कामगारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून काही माहिती उपलब्ध होते का? त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगिले. उमाकांत खोत हे सायकलने आपल्या शेतजमिनीची पाहणी करण्यासाठी जात होते. अर्ध्यावर सायकल ठेवून पुढे चढणीवर चालत जात होते. त्याठिकाणी जेसीबीद्वारे डोंगरकापणी होत असल्याचा दावा करून याविषयी त्यांनी आपल्या पणजी येथील भाच्याला फोनद्वारे सर्व माहिती दिली.
उमाकांतना तोंड बंद करुन केली जबर मारहाण
डोंगरफोड होत असल्याची माहिती उमाकांत खोत यांनी फोनवरुन आपल्या पणजीतील भाच्याला दिल्यानंतर भाच्याने तुम्ही नगरनियोजन म्हणजे टीसीपी विभागाला कळवा. आपणही कळवतो, असे त्यांना सांगितले. उमाकांत खोत त्याठिकाणी आल्याचे पाहताच काहीजणांनी त्यांना मारहाण केली. मारहाण करताना त्यांचे तोंड बंद केल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला केला आहे. घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या उमाकांत यांना अँम्ब्युलन्सद्वारे तुये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
टीसीपीकडे अनेकवेळा तक्रारी करुनही कारवाई नाहीच
मिळालेल्या माहितीनुसार उमाकांत खोत यांचा दावा होता की त्यांच्या कुळाच्या जमिनीमध्ये जमिनदाराने त्यांना विश्वासात न घेता परस्पर जमीन विकून व्यवहार केलेला आहे. त्यासाठी खोत यांचा विरोध होता. बेकायदेशीर डोंगरकापणी करून त्या जमिनीमधून रस्ता बिगर गोमंतकीयांनी नेला आहे, असा दावा करीत त्यांनी अनेकवेळा टीसीपीकडे लेखी तक्रार दिली होती. परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही. या ठिकाणी बांधकाम करण्यास विरोध करीत असल्यामुळेच उमाकांत खोत यांचा खून करण्यात आला, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
घटनास्थळी मोठा फौजफाटा
मांद्रे पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर सील केला आहे. घटना कुठे घडलेली आहे? कुठे पुरावे सापडतात? कुठे जेसीबीद्वारे काम सुरू होते. त्याचीही पाहणी स्वत: उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता करीत होते. पेडणे तालुका उपअधीक्षक सलीम शेख, मांद्रेचे निरीक्षक वीरेंद्र नाईक व अन्य पोलिसपथक रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. ज्या परिसरात उमाकांत खोत यांना मारहाण करण्यात आली त्या परिसराची पाहणी पोलिसांनी केली.
घटनास्थळी सुरु होते काम
ज्या परिसरात उमाकांत यांचा मृत्यू झाला. त्याच्या वरच्या बाजूला जेसीबीद्वारे काम सुरू होते. त्या ठिकाणी जमिनीला संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी टीसीपी आणि स्थानिक पंचायतीने परवाना दिल्याचा फलक लावण्यात आला आहे.
चौदा मजुरांना घेतले ताब्यात
मांद्रेचे पोलिस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. ज्या परिसरात ही घटना घडलेली आहे, तिथल्या 14 मजुरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून काही माहिती मिळते काय, या नजरेतून तपास करत आहे, असेही ते म्हणाले.