For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिचोली येथे टेंपोत आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह

08:11 AM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
डिचोली येथे टेंपोत आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह
Oplus_131072
Advertisement

घातपाताचा संशय, संशयावरून एक ताब्यात, शवचिकित्सेत स्पष्ट होणार मृत्यूचे कारण

Advertisement

डिचोली/ प्रतिनिधी

डिचोली बाजारातून जुन्या पोलिसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला बाजारातच असलेल्या एक इमारतीच्या खाली पार्क करून ठेवलेल्या टेंपोत मागील बाजूस एका महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच डिचोलीच्या पोलिस उपअधीक्षक बी. वी. श्रीदेवी व निरीक्षक विजय विजय राणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आला आहे.

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार, मयत महिला लक्ष्मी शिरोडकर (वय 55 वर्षे) या माटणे दोडामार्ग महाराष्ट्र येथील असून त्या डिचोली बाजारातच फिरून राहत होत्या. तीन चार दिवसांनी त्या आपल्या घरी जात होत्या. त्यांच्या सोबत लाखेरे बोर्डे डिचोली येथील अन्य इसम राहत होता. गुरू. दि. 25 डिसें. रोजी संध्याकाळी त्या इमारतीच्याखाली असलेल्या टेंपोमध्ये त्या इसमाने लक्ष्मी यांना बसविले आणि तो स्वत: एका दुकानाबाहेर झोपला होता.

काल शुक्र. दि. 26 डिसें. रोजी सकाळी टेंपोच्या लिफ्टमध्ये लक्ष्मी यांचा मृतदेह दृष्टीस पडल्याने या परिसरात गोंधळ उडाला. मृतदेहाच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आल्याने हे प्रकरण संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी लाखेरे बोर्डे येथील इसमास संशयावरून ताब्यात घेतले आहे. लक्ष्मी यांचा मृतदेह बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. आज शनि. दि. 27 डिसें. रोजी मृतदेहाची शवचिकित्सा झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. त्यानुसार या प्रकरणाचा दिशा मिळणार व पोलिस तपास हाती घेतला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.