दरोडा प्रकरणातील संशय आणखी गडद
नोंद 75 लाखांची, प्रत्यक्षात कोटी रुपये जप्त, तिघांना अटक : महामार्गावरील दरोडे कधी थांबणार?
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हरगापूरजवळील दरोडाप्रकरणी त्याच कारमधील तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारमध्ये गुप्त कप्प्यात ठेवलेले 1 कोटी 1 लाख रुपये ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. सोमवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना पोलीस प्रमुखांनी ही माहिती दिली आहे. प्रत्यक्षात 75 लाख रुपयांचा दरोडा झाल्याची फिर्याद संकेश्वर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. मात्र नेर्लीजवळ आढळून आलेल्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाभोवतीच संशय निर्माण झाला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांनी सोमवारी दुपारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली आहे. केरळमधील सोने कोल्हापुरात विकून त्याची रक्कम केरळला नेण्यात येत होती. त्यावेळी 75 लाख रुपयांचा दरोडा झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. संकेश्वर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआरही दाखल करण्यात आला. मात्र कारमध्ये 1 कोटी 1 लाख रुपये आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात 1 कोटी 56 लाख 50 हजार रुपये आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी पोलीस यंत्रणेची भूमिका संशयास्पद असून कारमधील तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर
हा दरोडा त्यांनीच घातला आहे का? किंवा या प्रकरणात आणखी कोणत्या गुन्हेगाराचा हात आहे का? आदी प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दोन मोबाईल वेगवेगळ्या दिशांना नेण्यात आले आहेत. कारमधील तिघा जणांनी दरोड्याचा बनाव केला असतील तर यासंबंधीही पोलीस दलाकडून खुलासा करण्यात आला नाही. 75 लाख रुपयांचा दरोडा झाल्याची नोंद असताना कारमध्ये मोठी रक्कम कोठून आली? सुरुवातीपासूनच याप्रकरणी स्थानिक पोलिसांची दिशाभूल सुरू होती. पुर्वानुभव लक्षात घेता अनेकवेळा पोलीस अधिकाऱ्यांनीच रक्कम पळविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तरी सखोल चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.