पूजा नाईकच्या बदलत्या निवेदनांमुळे संशय
घोटाळ्याची आकडेवारी दिली तरी पुरावे नाही : नावे जाहीर करण्याची टाळाटाळही संशयास्पद,प्रकरणामुळे सरकारविरोधात वाढता आक्रोश,राजकीय वासामुळे विषय जाऊ शकतो कुठेही
पणजी : सरकारी नोकरीसाठी पैसे प्रकरणात मुख्य आरोपी पूजा नाईक हिने वारंवार निवेदने बदलण्याच्या प्रकाराने संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाला आता राजकीय वास येऊ लागल्याने हे प्रकरण भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्यावर्षी हे प्रकरण उफाळून आले त्यावेळी या प्रकरणात असलेल्या मंडळींची नावे पूजा नाईक हिने पोलिसांना दिली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी अचानक पत्रकारांना माहिती देण्याचे बंद केले होते. पोलिसांना नेमके कोणाकडून आदेश आले हे समजले नाही.
नावे जाहीर करण्यास टाळाटाळ
आता एका वर्षानंतर पूजा नाईक अचानक खडबडून जागी झाली आणि तिने एका वृत्तवाहिनीकडे बोलताना सरकारला तसेच संबंधित अधिक्राऱ्यांना आणि मंत्र्याला 24 तासांची मुदत दिली. मात्र या प्रकरणास बहात्तर तास उलटून गेल्यानंतर देशील तिने व्यवस्थित खुलासे केलेले नाहीत. अधिकाऱ्यांची नावे जाहीर केलेली नाहीत, तसेच संबंधित मंत्र्याचे नाव घेण्याचेही टाळले आहे.
पूजा नाईकच्या निवेदनांत तफावत
एकंदरीत याप्रकरणी राज्यातील सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. अनेक मंत्र्यांची नावे त्यात समाविष्ट केली जात आहेत आणि प्रकरणाची गुंतागुंत आणखी वाढवून ठेवली आहे. पूजा नाईक हिच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर देखील सडकून टीका होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व सरकार सध्या या प्रकरणाने अडचणीत आले असल्याने कोणत्यातरी एका मंत्र्याला टारगेट केले जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच पूजा नाईक हिने यापूर्वी दिलेली जबानी व सध्या ती जी काही निवेदने करीत आहेत त्यामध्ये देखील तफावत दिसून येते.
प्रकरणाला राजकीय वास
एकंदरीत या प्रकरणाला राजकीय वास आता येऊ लागला आहे. या प्रकरणाच्या तळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेला असला तरी देखील याची सखोल चौकशी सरकारला कितपत परवडेल हे सांगता येणार नाही. मात्र याप्रकरणी कोणत्यातरी एका मंत्र्याला टार्गेट केले जाणार असा अंदाज आहे.
पुरावेत आहेत कुणाकडे?
वारंवार निवेदने बदलणाऱ्या पूजा नाईक हिने दिलेली जवानी नेमकी खरी कोणती? याबाबत पोलिसांमध्ये संशय निर्माण झाला आहे तथापि तिने जी नावे दिली, त्यांच्याकडे दिलेल्या रुपायांबाबतचा पुरावा कोणाकडे नाही. एवढेच नव्हे तर मंत्र्यांनी ओळख करून दिली याचाही पुरावा कोणाकडे नाही.
सरकारविरुद्ध वाढता आक्रोश
प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियावर होणारी खमंग चर्चा त्यातून सरकारविरोधात निर्माण होणारा आक्रोश वाढत आहे. पोलिस यंत्रणेवर त्याचबरोबर सरकारवर देखील बराच दबाव आलेला आहे. परंतु पूजा नाईक सांगतेय ते सर्वच खरे आहे हे कसे धरता येईल ? असा प्रश्न पोलिस यंत्रणेसमोर उपस्थित झाला आहे.
पूजा नाईकच्या गौप्यस्फोटाकडे लक्ष
एकंदरीत या प्रकरणाची गुंतागुंत वाढत असून राजकीयदृष्ट्या काही जणांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पोलिसांनी फार सावध पावले उचलली आहेत. पूजा नाईक आता नव्याने कोणता गौप्यस्फोट करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पैसे घेणाऱ्याबरोबर देणाराही ठरतो भ्रष्टाचारी
नोकरीसाठी पैसे या घोटाळ्यात ज्यांचे पैसे गेले त्यांनी ते पैसे मिळावेत यासाठी पोलिसस्थानकाकडे तक्रारी केल्या आहेत की नाही? तक्रार करणाऱ्यांनी पूजा नाईक हिला पैसे दिले असतील, तर पैसे घेणाऱ्या बरोबरच पैसे देणारादेखील भ्रष्टाचारास कारणीभूत ठरतो. या प्रकारामुळे आता संपूर्ण प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढत आहे. कोणाकडे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे पूजा नाईक ही जी काही निवेदने करते, त्या आधारावर पोलिस त्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई कशी करू शकतील? हा एक नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. उद्या या महिलेने आणखी काही जणांची राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची नावे उघड केली तर त्यानुसार त्यांच्या विरोधात कारवाई होईल काय? असाही प्रश्न आहे.