Sangli News | सांगलीत ग्रामसेवकावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई! पण नेमकं कोणत्या 'घोटाळ्या'मुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कडकडले?
सांगली : आटपाडी तालुक्यातील दिघंची ग्रामपंचायतीचे तत्कालीनग्रामपंचायत अधिकारी हरिभाऊ चंद्रभान जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रशासकीय कामकाजात अनियमितता, कामासंदर्भात तक्रारी व अन्य कारणांवरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश जारीकेले.
ग्रामसेवक जाधव हे सध्या बांबवडे (ता. पलूस) येथे कार्यरत होते. निलंबन कालावधीत त्यांना मिरज पंचायत समितीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते दिघंची ग्रामपंचायतीत नियुक्त असताना कामकाजाविषयी बऱ्याच तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. भाजप नेते हणमंतराव देशमुख यांनी जाधव यांच्यावर कारवाईसाठीपाठपुरावा केला होता.
त्यांची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तक्रारीच्या चौकशीसाठी कडेगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला नुकताच प्राप्त झाला. त्यामध्ये जाधव यांच्याविरोधातील तक्रारींत तथ्य आढळले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली.