लोकसभेच्या आठ खासदारांचे निलंबन
अध्यक्षांवर कागद फेकल्याने केली कठोर कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लोकसभेतून विरोधी पक्षांच्या आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर कागद भिरकावल्याने त्यांच्या विरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली. भारत आणि चीन यांच्यात लडाख येथे काही काळापूर्वी झालेल्या संघर्षाच्या संदर्भात एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा उल्लेख विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला होता. तथापि, अशा अनधिकृत लेखांचा संदर्भ नियमानुसार लोकसभेत घेता येणार नाही, असे अध्यक्षांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या खासदारांनी प्रचंड गदारोळ करत अध्यक्षांवर कागद फेकले. त्यानंतर, ही कारवाई झाली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारप्रमाणे मंगळवारीही लडाख संघर्षाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी या लेखाचा संदर्भ घेतला होता. निवृत्त भूसेना प्रमुख मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा काही भाग या लेखात देण्यात आल्याचे बोलले जाते. तथापि, हे पुस्तक अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे प्रसिद्ध न झालेल्या पुस्तकांमधील आशयाचा आधार लोकसभेत आरोप करण्यासाठी घेऊ दिला जाणार नाही, असे राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या अन्य नेत्यांच्या निदर्शनास बिर्ला यांनी आणून दिले.
गदारोळ आणि गोंधळ
सदनाच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर राहुल गांधी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या संदर्भात बोलण्याची सूचना करण्यात आली. मात्र, त्यांनी पुन्हा या संघर्षाचाच मुद्दा उपस्थित केला. ज्या लेखाचा आधार त्यांनी सोमवारी घेतला होता. त्या लेखाची वैधत्वनोंद (ऑथेंटिकेशन) मी करत आहे, अशी घोषणा त्यांनी केली. वैधत्वनोंद केल्यानंतर सदस्याला अशा कागदाची स्वाक्षरी केलेली प्रत अध्यक्षांना सादर करावी लागत. मात्र, तसे करुनही काही उपयोग होणार नाही. कारण हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. त्यामुळे त्याचा संदर्भ घेतला जाऊ शकत नाही, असे पीठासीन सभाध्यक्ष कृष्णप्रसाद टेन्नी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ करण्यास प्रारंभ केला. भारत आणि अमेरिका यांच्यातील करारावरही विरोधकांनी आक्षेप घेण्यास प्रारंभ केला. काही खासदारांनी लेखाचे कागद अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने फेकले. तुम्ही सभागृहाच्या शिस्तीच्या नियमांचा भंग करीत आहात, अशी समज पीठासीन अध्यक्षांनी त्यांना दिली होती.
आठ खासदार निलंबित
त्यानंतर, विरोधी पक्षांच्या आठ खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या खासदारांपैकी 7 काँग्रेसचे आहेत. हिबी एडन, अमरिंदर सिंग राजा वारींग, मणीकम टागोर, गुरुजितसिंग औजला, प्रशांत यादवराव पडोळे, चमाला किरण कुमार रे•ाr आणि डीन कुरियाकोस अशी काँग्रेसच्या सात खासदारांची नावे आहेत. तर एस. व्यंकटेशन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार आहेत.
किरण रिजीजू यांचा प्रस्ताव
सभागृहात शिस्तभंग केल्यामुळे या खासदारांचे निलंबन करण्यात यावे, असा प्रस्ताव लोकसभेत केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी सादर केला. या अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत या खासदारांचे निलंबन करावे, अशी सूचना त्यांनी या प्रस्तावात केली. विरोधी पक्षांनी यावेळी प्रचंड गदारोळ केला. तथापि, त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न करुनही हा प्रस्ताव लोकसभेत बहुमताने संमत करण्यात आला. त्यानंतर या खासदारांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास प्रारंभ केला.
राहुल गांधी यांचे पत्र
लोकसभेत आपल्याला बोलू दिले जात नाही. आपले म्हणणे ऐकण्याचे साहस सत्ताधाऱ्यांपाशी नाही. त्यामुळे माझ्या गणतंत्रीय अधिकारांची पायमल्ली केली जात आहे. लोकसभेच्या सभाध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या या वर्तनावर कारवाई करावी. सदनात सदस्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याचे उत्तरदायित्व सभाध्यक्षांचे आहे. त्यांनी या प्रकरणी न्याय करावा, अशी मागणी करणारे एक पत्र राहुल गांधी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठविले आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेतून सभात्याग केला. संसदेच्या मकर प्रवेशद्वारापाशी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अन्य खासदार जमले. त्यांनी घोषणा दिल्या. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील कराराला जोरदार आक्षेप घेत विरोधही केला आहे.
बॉक्स
गदारोळामुळे कामकाज स्थगित
ड लोकसभेतील गदारोळामुळे अनेकवेळा कामकाजात लोकसभेत व्यत्यय
ड शिस्तभंग केल्याने काँग्रेसच्या खासदारांना समाध्यक्षांची अनेकवेळा समज
ड राहुल गांधी यांचा संसदेबाहेर भारत-अमेरिका कराराला मोठा विरोध
ड राहुल गांधी यांच्याकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र