‘ईशा फाऊंडेशन’वरील कारवाईला स्थगिती
वृत्तसंस्था / .नवी दिल्ली
तामिळनाडूतील ‘ईशा फाऊंडेशन’ या संस्थेला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या संस्थेच्या आश्रमाच्या परिसरात कारवाई करण्यापासून न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना रोखले आहे. ही स्थगिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी सुनावणीनंतर दिली. त्यांनी या संदर्भातील मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णयही फिरविला आहे. या संस्थेच्या आश्रमात दोन महिलांना डांबून ठेवण्यात आले आहे, असा आरोप संस्थेवर करण्यात आला होता.
संस्थेच्या आश्रमात 2 महिलांना बंधक बनवून ठेवण्यात आले असल्याचा आरोप आहे. तसे असल्यास त्यांची सुटका करावी आणि त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करावे, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने एका हेबियस कॉर्पस याचिकेच्या सुनावणीनंतर दिला होता. या आदेशानंतर तामिळनाडू सरकारने आश्रमात पोलिस पाठवून चौकशी चालविली होती. तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. तेथे संस्थेला हा दिलासा मिळाला.
याचिका काढून घेतली
सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाकडून हेबियस कॉर्पस याचिका काढून स्वत:कडे घेतली आहे. ही याचिका या महिलांच्या वडीलांनी सादर केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच्या वेळी या दोन महिलांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यावेळी या महिलांनी आपण स्वत:हून आय आश्रमात आलो असून कोणीही आपल्याला डांबून किंवा कोंडून ठेवलेले नाही, अशी वस्तुस्थिती स्पष्ट केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने संस्थेविरोधात कोणतीही कारवाई करु नये, असा आदेश पोलिसांना दिला आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी आता 14 ऑक्टोबरनंतर केली जाणार आहे.