वेतनवाढीचा करार स्थगित करा, कपात नको
नागिरका स्पिनिंग मिलच्या कामगारांची भूमिका
वेतन कपातीच्या करारावरून कर्मचारी-संघटनांमध्येच वाद
कामगारांना विश्वासात न घेता करार केल्याचा आरोप
कोणत्याही परिस्थितीत पगार कपात मान्य नसल्याचा निर्णय
कोल्हापूर
पन्हाळा तालुक्यातील यवलूज येथील नागरिक स्पिनिंग मिलमध्ये २० टक्के वेतन कपातीच्या करारावरून कामगार आणि संघटनेमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. संघटनेने विश्वासात न घेता मिल व्यवस्थापनाशी करार केला असून तो मान्य नसल्याची कामगारांची भूमिका आहे. कंपनी अर्थिक अडचणीत असेल तर ऑगस्ट २०२३ पासून पुढील चार वर्षांसाठी जो वेतनवाढीचा करार करणे अपेक्षित होते, तो स्थगित केला तरी चालेल. पण वेतन कपातीचा निर्णय कधीही मान्य करणार नाही. या कराराविरोधात लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे नागरिका मिलच्या कामगारांनी स्पष्ट केले.
उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बिघडल्यामुळे नागरिका स्पिनिंग मिल अर्थिक अडचणीत असल्याचा व्यवस्थापनाचा दावा आहे. बाजारपेठेतील बिकट परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अन्य मिल्स बंद असताना देखील वेतन कपात करून मिल सुरुच ठेवण्याचा मुद्दा पुढे आला. पण त्याला कामगारांनी विरोध केला आहे. त्यामुळे भारतीय कर्मचारी महासंघाचे नेते आमदार भाई जगताप यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. त्यानंतर आमदार जगताप यांनी मिल व्यवस्थापनाशी वेतन कपातीचा करार करून तो सर्वांना मान्य करावा लागेल असे स्पष्टपणे सांगितले. पण हा निर्णय कागमारांनी मान्य केला नसल्यामुळे कामगार आणि संघटनेमध्येच दुफळी निर्माण झाली आहे. कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना मिल व्यवस्थापनाच्या दावणीला बांधली गेल्यामुळेच आमच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे.
मिलमध्ये सध्या ४३५ कायम आणि ७६ बदली कामगार कार्यरत आहेत. २०१९ मधील जागतिक अर्थिक मंदीचे वातावरण, त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट, महापूर आणि बाजारपेठेतील चढउतार यामुळे मिलची अर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०२४ पासून मिलची अर्थिक परिस्थिती पुन्हा नाजूक होत गेली. त्यामुळे संघटनेने स्वत: सी.ए. मार्फत कंपनीच्या अर्थिक स्थितीची माहिती घेऊन अन्य सूत गिरण्यांना भेट देवून त्यांच्या अर्थिक परिस्थितीची माहिती घेतली. यामध्ये अनेक सूत गिरण्या बंद असल्याचे आढळले. त्यामुळे सर्व बाबींचा सर्वंकष विचार करूनच पुढील तीन वर्षांसाठी २० टक्के वेतन कपातीचा करार करून मिल सुरळीतपणे सुरु ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे संघटना प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
वेतनवाढीची मागणी असताना वेतन कपातीचा करार
नागरिका स्पिनिंग मिल व्यवस्थापन व भारतीय कर्मचारी महासंघ यांच्या बैठकीत १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२३ या चार वर्षांसाठी वेतन वाढीचा करार झाला होता. त्यानंतर पुढील करार करण्याची कामगारांची मागणी असताना कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे केले जात असल्याचा कामगारांचा आरोप आहे.
नागरिका मिलचे काम काही कालावधीसाठी स्थगित
देशातील सुतगिरण्या काही वर्षांपासून अर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करत आहेत. महागलेला कच्चा माल, त्या तुलनेत पक्क्या मालाची कमी किंमत, निर्यात बंदी यामुळे पूर्ण टेक्स्टाईल उद्योगाचे अर्थकारण कोलमडले आहे. अशा परिस्थितीत जिह्यातील १० ते ११ सुतगिरण्या बंद पडल्या आहेत. नागरिका स्पिनिंग मिलचा विचार करता गेल्या चार वर्षांपासून दर महिन्याला दीड कोटींचे नुकसान होत आहे. कच्चा मालदेखील संपला आहे. परिणामी मिलमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मिलचे काम काही काळ स्थगित केले आहे. भविष्यात काही तडजोडीचे निर्णय झाल्यास मिलचे कामकाज पुन्हा सुरु केले जाईल. अन्यथा मिलचे कामकाज कायमस्वरूपी बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्यवस्थापन, नागरिका स्पिनिंग मिल, यवलूज
वेतन कपातीचा निर्णय अमान्य
वेतनवाढीचा करार करण्याऐवजी २० टक्के वेतन कपातीबाबत संघटना आणि मिल व्यवस्थापनामध्ये झालेला करार कमगारांना मान्य नाही. कामगार संघटना आणि मालकाच्या संगनमताने कंपनी तोट्यात असल्याचे सांगून वेतन कपतीचा घाट घातला जात आहे, हे मान्य नाही.
जगन्नाथ रामाणे , कामगार
कंपनीच्या विरोधात कामगार न्यायालयात दावा दाखल
कामगारांच्या हितासाठी व मिल टिकवण्यासाठी वेतन कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा करार तीन वर्षांसाठी आहे. दरम्यानच्या कालावधीत कंपनीची अर्थिक सुधारणा झाल्यास वेतन कपातीच्या निर्णयात शिथिलता आणली जाईल. संघटनेच्यावतीने कंपनीच्या विरोधात कामाला स्थगिती दिल्याबद्दल कामगार न्यायालयात दावा दाखल केला असून आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत.
दिलीप मिसाळ, युनियन अध्यक्ष, नागरिका स्पिनिंग मिल