‘याला तत्काळ सस्पेंड करा’!
गोमेकॉच्या अधीक्षकांना आरोग्यमंत्र्यांचा बेधडक आदेश : राज्यात तीव्र संताप
प्रतिनिधी/ पणजी
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन गोमेकॉच्या आपत्कालीन विभागातील मुख्य आरोग्याधिकाऱ्याला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सेवेतून तत्काळ निलंबित केले. त्यासंबंधी आदेश त्यांनी शनिवारी जारी केला. आरोग्यमंत्र्यांच्या या बेधडक कारवाईमुळे राज्यात खळबळ माजली असून भारतीय आरोग्य संघटनेने तर या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची प्रतिक्रिया विचारली असता, आधी संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतरच वक्तव्य करेन, असे ते म्हणाले.
मंत्री राणे यांनी शनिवारी गोमेकॉत आकस्मिक भेट दिली व कामकाजाची पाहणी केली. त्यापूर्वी तेथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. ऊद्रेश हे तेथे उपचारांसाठी आलेल्या एका ऊग्णाशी उर्मट पद्धतीने वागल्याची तक्रार मंत्र्यांकडे आली होती. प्रारंभी विविध वॉर्डमध्ये रोजची पाहणी केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी डॉ. ऊद्रेश यांना पाचारण केले व त्यांच्या वर्तवणुकीबद्दल सर्वांसमक्ष जाब विचारला. त्यानंतर त्यांनी लगेचच सदर डॉक्टरला तत्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केले. या प्रकाराचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये मंत्री राणे सदर डॉक्टराला कठोर शब्दात फटकारत असल्याचे दिसत आहे. ‘तुम्ही डॉक्टर आहात, तुमचे बोलणे सुसंस्कृत असले पाहिजे. ऊग्णांशी नीट वागा. अहंकार दाखवू नका. हे ऊग्ण आहेत, ग्राहक नाहीत. तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहात, हे विसरू नका. असे वागणे जमत नसेल तर घरी चला!’ असे मंत्र्यांनी सदर डॉक्टरला सुनावले.
त्यावेळी सदर डॉक्टरने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्र्यांनी त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. जे काही सांगायचे आहे ते आता नको, ज्यावेळी कारवाई होईल त्यावेळी उत्तर द्या, असे सांगितले. पुढे बोलताना मंत्र्यांना सदर डॉक्टरला, पुढील दोन वर्षे तरी तुम्हाला गोमेकॉत काम करताना मला पाहायचे नाही, असे सांगितले व सोबत असलेले अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांना सदर डॉक्टरच्या निलंबनाची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले.
प्राप्त माहितीनुसार सदर डॉक्टरबद्दल याआधीही मंत्र्यांकडे अनेक तक्रारी पोहोचल्या होत्या. त्यात ऊग्णांसह गोमेकॉतील काही डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश होता, असे समजले आहे. काल आरोग्यमंत्री त्यांच्यावर चिडण्यासही तसेच कारण ठरले. ईद असल्याने ओपीडी बंद होती, त्यामुळे काही ऊग्णांना इंजेक्शनसाठी कॅज्युअल्टीमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र त्यांच्याशी उद्धट वागताना डॉ. ऊद्रेश यांनी त्यांना, आपण येथे इंजेक्शन्स देण्यासाठी बसलेलो नाही. तुम्ही आरोग्य केंद्रात जाऊन इंजेक्शन करून घ्या, असा सल्ला दिला होता व हा प्रकार आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला होता.
दरम्यान, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री राणे यांनी, आरोग्य सेवेतील कोणताही सरकारी कर्मचारी ऊग्णांशी उद्धट, उर्मट वागत असेल तर अशीच कारवाई पुढेही सुरूच राहील, असा इशारा दिला. गोमेकॉसारख्या संस्थेत काम करणाऱ्या डॉक्टरांनी नम्रतेने आणि सहानुभूतीने वागले पाहिजे, असेही राणे म्हणाले.
नाही म्हटल्यास गोमेकॉतील बहुतेक डॉक्टर्स ऊग्णांची योग्य पद्धतीने सेवा करतात. मात्र काहींची वागणूक उर्मट आणि उद्धट असते. त्यामुळे चांगल्यांचीही बदनामी होते व त्यांनाही नाहक त्रास सहन करावे लागतात. हे सर्व थांबविण्यासाठीच मंत्री म्हणून मला हे पाऊल उचलावे लागले आहे, असेही राणे यांनी पुढे पत्रकारांना सांगितले.
राणेंनी माफी मागावी फेमाची 72 तासांची मुदत
दरम्यान, अखिल भारतीय वैद्यकीय संघटना महासंघ (फेमा) यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवलेल्या एका तातडीच्या पत्रामध्ये आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला जी हीन वागणूक दिली. त्याबद्दल तीव्र संताप आणि निषेधही व्यक्त केला आहे. या अशा वागणुकीमुळे आम्हाला धक्काच बसल्याचे संघटनेने म्हटले आहे. डॉक्टरची चारचौघांमध्ये सर्वांच्या समक्ष ज्या पद्धतीने नाचक्की करण्यात आली हा त्यांच्यावर केलेला शाब्दिक आघात आहे. आरोग्यमंत्र्यांनी सदर डॉक्टरला इस्पितळाचे कर्मचारी, आरोग्य अधिकारी, आलेले ऊग्ण इत्यादींच्यासमोर दिलेली वागणूक ही अत्यंत मानहानीकारक आहे. ज्या आरोग्यधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आलेले आहे ते अतिशय प्रामाणिकपणे चांगली सेवा बजावत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा दुऊपयोग केलेला आहे व हा अत्यंत चुकीचा व गंभीर पायंडा आहे. यामुळे आरोग्यमंत्र्यांनी त्वरित आरोग्याधिकाऱ्यांची जाहीर माफी मागावी तसेच या प्रकरणाची समिती नेमून चौकशी करण्यात यावी. 72 तासांमध्ये यावर तोडगा निघाला नाही तर फेमा देशभरात या आरोग्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन आणि निषेध करणार आहे. तसेच काळ्या फिती लावून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यावर विचार करीत आहे. डॉक्टर हे सत्तेचे सेवक नाहीत ते विज्ञान सेवा आणि मानवता यांचे सेवक आहे, असे सदर पत्रकात म्हटले असून या पत्राच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री, भारतीय वैद्यकीय संघटना, मानव हक्क आयोग इत्यादींना पाठवण्यात आल्या आहेत.
आरोग्यमंत्री नक्की काय बोलले
1) खिशात हात घालून माझ्यासमोर उभे राहू नका, हात बाहेर काढा.
2) तुमचा अहंकार दाखवू नका, ऊग्णांशी नीट वागा.
3) मी बोलत असताना तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही.
4) तुम्ही येथून निघून जा. मी तुम्हाला घरी जाण्यास सांगत आहे. नाहीतर सुरक्षारक्षकांकडून बाहेर फेकून देईन.
5) तुम्ही एक डॉक्टर आहेत. जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका.
6) तोंडावरील मास्क हटवा. मला तुमचा चेहरा पहायचा आहे.
7) तुमच्यावर कामाचा ताण असला तरीही ऊग्णांशी सभ्यतेने वागा.
8) तुम्हाला पुढील दोन वर्षांसाठी निलंबित करेन आणि माझा कार्यकाळ असेपर्यंत तरी तुम्हाला गोमेकॉत आणणार नाही.
9) जेव्हा मी माझे मन बनवतो तेव्हा मला तुमचे ऐकायचे नाही.