For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संशयिताचे वडील भाजपचे सदस्य नाहीत : तेंडुलकर

03:09 PM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
संशयिताचे वडील भाजपचे सदस्य नाहीत   तेंडुलकर
Advertisement

कुडचडे : कुडचडे मतदारसंघाला हादरवून सोडणाऱ्या लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाला सध्या राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य संशयित सोहम नाईक याचे वडील नगरसेवक सुशांत नाईक हे भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक किंवा सक्रिय सदस्य नाहीत, असे माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केले आहे. कुडचडे भाजप मंडळातर्फे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Advertisement

यावेळी कुडचडे भाजप मंडळ अध्यक्ष मनोज नाईक, नगरसेवक प्रदीप नाईक, आशिष करमली आणि राजेंद्र वस्त उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर सुशांत नाईक, जे कुडचडे-काकोडा नगरपालिकेचे नगरसेवक आहेत, त्यांचा उल्लेख भाजप कार्यकर्ते म्हणून केला जात आहे, याकडे लक्ष वेधून त्यास तेंडुलकर यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, मी स्वत: भाजपच्या मुख्य कार्यालयात जाऊन पक्षाच्या अधिकृत सदस्य आणि कार्यरत सदस्यांची यादी तपासली आहे.

त्या यादीत सुशांत नाईक यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ते भाजपचे सदस्य आहेत या दाव्यात कोणतेही तथ्य नाही, असे ते म्हणाले. हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि भयानक असल्याचे सांगत तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भूमिकेचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. त्यात गुऊवारी गुन्हा अन्वेषण विभागाने संशयिताच्या घराची झडती घेऊन चौकशी केली आहे.

Advertisement

तसेच संशयिताविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हे नोंदवण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे तेंडुलकर यांनी सांगितले. मनोज नाईक यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हावा आणि दोषींना कडक शिक्षा मिळावी ही आमची मागणी आहे. मात्र या प्रकरणात भाजपचे नाव ओढून ज्या प्रकारे त्याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो, असे उद्गार त्यांनी काढले.

Advertisement
Tags :

.