जैसलरमध्ये पाक सीमेवर संशयित युवकाला अटक
वृत्तसंस्था/ जैसलमेर
दिल्लीतील कारबॉम्ब स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. गुजरातपासून राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये तसेच सीमावर्ती भागांमध्ये दक्षता वाढविण्यात आली आहे. याचदरम्यान बीएसएफने राजस्थानच्या जैसलमेर येथून आंतरराष्ट्रीय सीमेनजीक एका 21 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. हा युवक राजस्थानातून पाकिस्तानात शिरण्याच्या तयारीत होता. उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूर येथील रहिवासी पंकज कश्यप नावाच्या या युवकाला ताब्यात घेण्यात आला आहे. या युवकाला सीमेनजीक संशयास्पद स्वरुपात फिरताना पाहिले गेले होते. बीएसएफ जवानांनी मोहनगढ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कालवा क्षेत्रात युवकाला रोखले. त्याचे संशयास्पद वर्तन पाहून जवानांनी कसून चौकशी केली.
प्रारंभिक चौकशीत युवकाने आपण पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत होतो असा खुलासा केला. बीएसएफने या युवकाला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन पेले आहे. युवकाचा उद्देश जाणून घेण्यासाठी सोमवारी विविध सुरक्षा यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे.