कर्नाटक-केरळ सीमाभागात संशयित नक्षलवाद्यांचा वावर
पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशनला प्रारंभ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बंदोबस्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक-केरळ सीमाभाग आणि आसपासच्या भागात संशयित नक्षलवादी दिसून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे आवश्यक बंदोबस्त करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. राज्यातील 28 मतदारसंघांसाठी 26 एप्रिल आणि 7 मे रोजी दोन टप्प्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
याबाबत माहिती देताना उडुपीचे पोलीस अधीक्षक अऊण के. यांनी, काही दिवसांपूर्वी कर्नाटक-केरळ सीमा आणि आसपासच्या भागात संशयित नक्षलवादी दिसले होते. आम्ही नक्षलविरोधी दलांसोबत ऑपरेशन राबवित असून शेजारच्या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. याचबरोबर स्थानिकांकडून नक्षल कारवायांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
मतदानाच्या दिवशी सर्व नक्षलग्रस्त मतदान केंद्रांचे संरक्षण केंद्रीय निमलष्करी दलाकडून केले जाईल याची खात्री करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणतीही समस्या आलेली नाही. मात्र, शांततेत निवडणुका व्हाव्यात यासाठी आम्ही पुरेशी व्यवस्था केली आहे, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.