सांत इनेज परिसरात गॅस गळतीचा संशय ! गळती शोधण्यासाठी पादचारी मार्ग खोदला
पणजी : येथील सांत इनेज परिसरातील मुख्य निवासी आणि व्यावसायिक भाग असलेल्या तांबडी माती सर्कल जवळ भूमिगत गॅस पाईपलाईन गळतीची घटना समोर आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गॅस गळतीचे नेमके ठिकाण आणि त्यातील तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने पावले उचलत तांबडी माती सर्कलजवळील पादचारी मार्ग खोदला आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर तपासणी आणि दुरुस्तीचे काम सुरु आहे.
या भागात गेल्या दोन दिवसांपासून गॅसचा संशयास्पद वास येत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनाला आले होते. निवासी इमारती आणि व्यावसायिक दुकाने अगदी जवळ असल्याने गॅस गळतीमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी स्थानिक रहिवाशांनी तातडीने आपत्कालीन सेवा आणि तांत्रिक विभागाला याची माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशामक दल, तांत्रिक तज्ज्ञ आणि आपत्कालीन यंत्रणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गॅस पाईपलाईन जमिनीच्या आतून जात असल्याने गळतीचे मूल केंद्र शोधण्यात सुरुवातीला अडचणी येत होत्या. अखेर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि पाईपलाईनची थेट तपासणी करण्यासाठी आज तांबडी माती सर्कल परिसरातील फूटपाथ जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आला आहे.
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
सध्या तांत्रिक कर्मचारी आणि कामगार भूमिगत पाईपलाईनच्या दुरुस्ती कामात व्यस्त आहेत, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नागरिकांना आणि पादचाऱ्यांना या खोदकाम केलेल्या मार्गावरून ये-जा करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत तांत्रिक पथक घटनास्थळी तैनात राहणार असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.