संशयित दीपश्रीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
प्रतिनिधी / पणजी
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून राज्यात अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयित दीपश्री सावंत गावस हिला काल येथील प्रथमवर्ग न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. गुरुवारी तिला लेखा संचालनालयात अकाऊंटंटची नोकरी देण्याचे आमिष दाखवून नादोडातील एका युवकाला 10.35 लाखांना गंडा घातल्या प्रकरणी पणजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शुक्रवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
याप्रकरणी अर्जुन वामन देसाई (वाडी नादोडा, बार्देश) यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार प्राथमिक तपास करून संशयित महिलेला अटक केली होती. तिच्या विरोधात भादंसंच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
संशयित दीपश्री हिने तक्रारदाराला लेखा संचालनालयात अकाऊंटंटची नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी तक्रारदाराकडून तिने 10 लाख 35 हजार ऊपये घेतले होते. हा फसवणुकीचा प्रकार गेल्या 2018 मध्ये घडला होता. पण संशयित महिलेने नोकरी दिली नाही किंवा घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे शेवटी तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली होती.
याच दरम्यान दीपश्री हिला दुसऱ्या प्रकरणात फोंडा पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, पणजी पोलिसांनी तिच्या कोठडीसाठी फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाच्या आदेशानुसार, पणजी पोलिसांनी गुऊवार 28 रोजी दीपश्रीला अटक केली. याच दरम्यान तिने पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. शुक्रवार 29 रोजी तिला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. तिच्या जामीनअर्जावर पुढील सुनावणी सोमवार 2 डिसेंबर रोजी होणार आहे.
गहाण ठेवलेले दागिने दीपश्रीला मिळणे कठीण
दागिने गहाण ठेवून कर्ज देणाऱ्या एका खासगी कंपनीने संशयित संहसयित आरोपी दीपश्री सावंत हिने बँकेकडे गहाण ठेवलेले दागिने परत न करण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले आहे. मात्र सदर कर्ज फेडण्यासाठी सावंत हिने हफ्ता भरल्यास ती स्वीकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मान्यता दिली आहे.
सदर खासगी बँक कंपनीने दीपश्री हिच्या कर्जाबाबत स्पष्टता समजण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर जर फोंडा पोलिसांनी जर दागिने ताब्यात घ्यायचे असेल तर संबंधित पोलीस स्थानकातील न्यायालयाला अर्ज करून परवानगी घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दीपश्रीसह प्रिया यादव, सुनीता पावसकर, श्रुती प्रभुगावकर, उमा पाटील आणि अन्य काही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी लोकांकडून रोख रकमेबरोबरच दागिनेही हमी रक्कम म्हणून घेतले होते. हे दागिने विकून अथवा गहाण ठेवून सर्व आरोपी ऐषारामाचे जीवन जगत असून त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्याही असल्याचे सिद्ध झाले आहे.