कवठेमहांकाळमध्ये महिलेच्या खूनप्रकरणी संशयितास अटक
सांगली :
धुळगाव रस्ता परिसरातील शानाबाई शंकर जाधव (वय ५८) या महिलेचा मृतदेह दि. २६ मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरी आढळून आला होता. या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पोलीस चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली आहे. सदर खून अनैतिक संबंधाच्या कारणातून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. किरण आकाराम गडदे (वय २०, रा. बाज ता. जत) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शानाबाई जाधव या धुळगाव रस्त्यावरील हॉटेल डायमंड जवळ एका खोलीत भाड्याने राहत होत्या. मयत शानाबाई जाधव या फोन उचलत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी शानाबाई जाधव या राहत्या घरी जावून पाहणी केली. त्यावेळी घरास कुलुप होते. मात्र घरातून दुर्गंधीचा वास येत होता. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून पाहिले असता घरात शानाबाई यांचा मृतदेह आढळून आला. घराला बाहेरून कुलूप असल्यामुळे संशयिताने महिलेचा गळा दाबून खून केला असावा व कुलूप लावले असावे असे शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. घटनास्थळाची पाहणी केली असता कोणताच पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे तपासाचे पोलिसांसमोर आव्हान होते.
तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे आल्यावर सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोहेको अनिल कोळेकर, संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे यांना कवठेमहांकाळ मधील खुनाच्या गुन्हयातील संशयित आरोपी किरण गडदे हा असल्याची तसेच तो मालगाव येथील लक्ष्मीनगर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला.
त्यावेळी एक युवक संशयितरित्या थांबलेला दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु नंतर त्याने खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या कारणातून झालेल्या वादातून दि. २३ मार्चच्या रात्री गळा दाबून महिलेचा खून केल्याची कबुली दिली. सदर आरोपीस कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे .