Sushma Andhare On Devendra Fadnavis : तुमची भाषा संसदीय परंपरेला अशोभनीय"; 'मिसिंग लिंक' भाषणावरून सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
पुणे : शिवसेने (ठाकरे गट)च्या नेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर केलेल्या भाषणावर तीव्र आक्षेप घेत खुल्या पत्राद्वारे सोशल मीडियावर निशाणा साधला आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्री यांनी वापरलेली भाषा संसदीय परंपरेला अशोभनीय असल्याचा आरोप त्यांनी केला.
अंधारे यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पेपरफुटी, महिला सुरक्षा, आंदोलन करणारे विद्यार्थी व कर्मचारी यांसारख्या गंभीर विषयांवर मुख्यमंत्री सविस्तर भूमिका मांडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू 'मिसिंग लिंक' प्रकल्प ठरला. या प्रकल्पावर उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी 'कुत्ते', 'भाडे के टट्टू' यांसारखी शब्दावली वापरल्याचा आरोप करत त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
'मिसिंग लिंक' प्रकल्पासाठी जनतेच्या करातून सुमारे ७,१२० कोटी रुपये खर्च झाले असून, प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारणे हा लोकांचा अधिकार आहे. प्रश्न विचारणाऱ्यांना अपमानास्पद संबोधणे योग्य नसल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. तसेच २०२२ मध्ये विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी "तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही" असे केलेल्या विधानाची आठवण करून देत, हाच निकष आज स्वतःलाही लागू होतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांपासून महिला सुरक्षेपर्यंत, पेपरफुटी, ड्रग्ज, औद्योगिक प्रकल्पांचे स्थलांतर, मराठी माणसांच्या प्रश्नांसह अनेक गंभीर मुद्द्यांवर सरकारने अपेक्षित ती भूमिका घेतली नाही, अशा विविध घटनांचा उल्लेख करत अंधारे यांनी सरकारवर टीका केली आहे. विरोधी मतांना शत्रूप्रमाणे वागवणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले.सभागृहात वापरलेल्या भाषेमुळे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान झाल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी आपल्या खुल्या पत्राच्या शेवटी म्हटले आहे.