‘भाजपमध्ये आलेल्या नव्या नेत्यांचे काय हाल होतात, हे पाहिलंय’; पण मी काँग्रेस सोडणार नाही’; सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, आपल्याला अनेकदा भाजपमध्ये येण्यास सांगण्यात आले. मात्र, आपण काँग्रेसमध्ये असून, याच पक्षाचे काम करत राहणार आहोत. ‘मी तिकडे काँग्रेसमध्ये आहे, तर इकडे भाजपमध्ये येऊन काय करणार? तुमच्यात ढवळाढवळ कशाला करू?’ असे आपण संबंधितांना सांगितल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था पाहिली आहे’
भाजपमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या परिस्थितीवर भाष्य करताना शिंदे यांनी पक्षांतराच्या राजकारणावर टीका केली. भाजपमध्ये आलेल्या नवीन लोकांचे काय हाल होतात, हे आपण पाहिले असल्याचे ते म्हणाले. सुमारे 25 वर्षांपूर्वीही अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यावेळी अनेकांनी पक्ष सोडला; मात्र चार-पाच वर्षांत त्यातील अनेक जण पुन्हा परतले, अशी आठवण त्यांनी सांगितली.
नातवाच्या बॅनरबाजीचे समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नातू शिखर पाहारिया याने शुभेच्छांचे बॅनर लावल्याच्या मुद्द्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या नातवाने पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले, अशी बातमी आली. एक दिवस असे केल्याने काय बिघडले? मीसुद्धा नुकताच पंतप्रधानांना भेटलो,’ असे ते म्हणाले.
एखाद्या नेत्याला शुभेच्छा देणे किंवा त्याची भेट घेणे म्हणजे आपली राजकीय विचारसरणी बदलणे नव्हे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘मोदी माझ्याशीही बोलतात, शरद पवारांशीही’
राजकीय मतभेद असले तरी नेत्यांमधील संवाद कायम राहिला पाहिजे, असे सांगताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील संबंधांचे उदाहरण दिले.
‘पंतप्रधान जितके माझ्याशी बोलतात, तितकेच शरद पवारांशीही बोलतात. शरदराव तर त्यांना बारामतीला घेऊन जातात. एखाद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले, तर त्यात काय बिघडले?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी घडतात, तर काही निर्णयांवर टीकाही होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक घटनेचे योग्य विश्लेषण झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘लोकशाहीला काळिमा लागता कामा नये’
राजकारणातही चुका होत असतात. एखाद्याकडून नकळत चूक झाली असेल, तर ती समजून घेतली पाहिजे. पत्रकारांनी राजकीय घडामोडींचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. लोकशाही अधिक मजबूत झाली पाहिजे आणि तिच्या प्रतिष्ठेला धक्का लागता कामा नये, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर मिळाल्याचा दावा करत ती नाकारल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केल्याने त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसशी आपली निष्ठा कायम असल्याचे सांगतानाच त्यांनी भाजपमधील पक्षांतराच्या राजकारणावरही निशाणा साधला आहे.
