सूर्यवंशीच्या विक्रमी शतकाने भारताला नाममात्र आघाडी
वृत्तसंस्था / चेन्नई
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील वयोगटाच्या संघामध्ये येथे सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी वैभव सूर्यवंशीच्या युवा कसोटीतील सर्वात वेगवान शतकाने भारतीय युवा संघाला केवळ 3 धावांची नाममात्र आघाडी मिळाली.
चार दिवसांच्या अनाधिकृत कसोटी सामन्यातील खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया युवा संघाने दुसऱ्या डावात 39 षटकात 4 बाद 110 धावा जमवित भारतावर 107 धावांची बढत घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया युवा संघाचा पहिला डाव 293 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 62.4 षटकात सर्वबाद 296 धावा जमविल्या. 81 धावांवर नाबाद राहिलेल्या सूर्यवंशीने खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्याने 62 चेंडूत 4 षटकार आणि 14 चौकारांसह 104 धावांचे योगदान दिले. तसेच त्याने विहान मल्होत्रासमवेत सलामीच्या गड्यासाठी 133 धावांची भागिदारी केली. मल्होत्राने 108 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 76 धावा जमविल्या. भारताने बिनबाद 103 या धावसंख्येवरुन या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे 10 गडी 190 धावांत बाद झाले. या सामन्यात चौथ्या डावात 250 धावांच्या आसपास उद्दिष्ट मिळाल्यास संघाला विजयासाठी झगडावे लागेल. भारताच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ब्राऊनने 79 धावांत 3 तर फिरकी गोलंदाज विश्वा रामकुमारने 79 धावांत 4 गडी बाद केले. भारताच्या डावामध्ये ए. कुंडू आणि कर्णधार सोहम पटवर्धन यांनी पाचव्या गड्यासाठी 57 धावांची भागिदारी केली. कुंडूने 32 तर कर्णधार पटवर्धनने 33 धावा जमविल्या. मात्र भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीचा किंगसेल आणि ऑलिव्हर पिके यांनी दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागिदारी केली. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज मोहम्मद इनानने ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही फलंदाजांना पाठोपाठ बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात रिले किंगसेलने 77 चेंडूत 53 तर अॅडेन ओकॉनरने 70 चेंडूत 61 धावा जमविल्या. भारतातर्फे केरळच्या मोहम्मद इनानने 48 धावांत 3, समर्थ नागराजने 49 धावांत 3, आदित्य रावतने 50 धावांत 2 तसेच आदित्य सिंग आणि पटवर्धन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उभय संघामध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका यापूर्वी खेळविण्यात आली होती आणि भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा व्हाईटवॉश केला होता.
सूर्यवंशीचा नवा विक्रम
भारतीय युवा संघातील सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 19 वर्षांखालील वयोगटाच्या कसोटी क्रिकेटमध्ये जलद शतक झळकविण्याचा विक्रम केला आहे. सूर्यवंशीने केवळ 58 चेंडूत आपले शतक नोंदवून गेल्या 13 वर्षांमध्ये अबाधित राहिलेला विक्रम मोडीत काढला. सूर्यवंशीच्या स्फोटक खेळामध्ये 4 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश आहे. या सामन्यातील खेळाच्या पहिल्या दिवशी सूर्यवंशीने 47 चेंडूत नाबाद 81 धावा झळकविल्या होत्या. 19 वर्षांखालील वयोगटातील कसोटी इतिहासामध्ये सूर्यवंशीचे हे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक आहे. यापूर्वी म्हणजे 2005 साली इंग्लंडच्या मोईन अलीने 56 चेंडूत शतक झळकविले होते. सूर्यवंशीने भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये आणखी एक विक्रम यापूर्वी केला आहे. गेल्यावर्षी त्याने आपल्या वयाच्या 12 व्या वर्षी रणजी स्पर्धेत पदार्पण केले होते.
संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया प. डाव 293, भारत प. डाव 62.4 षटकात सर्वबाद 296 (वैभव सूर्यवंशी 104, विहान मल्होत्रा 76, पटवर्धन 33, कुंडू 32, थॉमस ब्राऊन 3-79, विश्वा रामकुमार 4-79), ऑस्ट्रेलिया दु. डाव 39 षटकात 4 बाद 110 (किंगसेल 48, पिके 32, मोहम्मद इनान 2-33)