सूर्यवंशी चमकला पण भारत अ हरला
वृत्तसंस्था / डोहा
आशिया चषक रायजिंग स्टार्स क्रिकेट स्पर्धेत येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तान शाहीन्सने भारत अ संघाचा 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीने 28 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 45 धावा झोडपल्या. पण भारत अ संघाला या सामन्यात पराभव टाळता आला नाही. पाकिस्तान शाहीन्सच्या माझ सदाकतला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात पाकिस्तान शाहीन्सने नाणेफेक जिंकून भारत अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. भारत अ संघाचा डाव 19 षटकात 136 धावांत आटोपला. पाकिस्तान शाहीन्सच्या अचूक गोलंदाजीसमोर भारत अ संघातील खेळाडूंना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. सलामीच्या वैभव सूर्यवंशीने 45, प्रियांश आर्यने 9 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. या सलामीच्या जोडीने 20 चेंडूत 30 धावांची भागिदारी केली. आर्य बाद झाल्यानंतर वैभव आणि नमन धीर यांनी 49 धावांची भर दुसऱ्या गड्यासाठी घातली. नमन धीरने 20 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 35 धावा जमविल्या. कर्णधार जितेश शर्मा 5, वधेरा 8, आशुतोष शर्मा 0 धावांवर बाद झाले. रमनदीप सिंगने 9 चेंडूत 1 षटकारासह 11 तर हर्ष दुबेने 15 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावा केल्या. भारत अ संघाच्या डावामध्ये 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. पाकिस्तान शाहीन्सतर्फे शाहीद अझिजने 24 धावांत 3, साद मसुदने 31 धावांत 2, सदाकतने 12 धावांत 2, उबेद शहा, अहमद डॅनियल आणि मुक्कीम यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तान शाहीन्सने 13.2 षटकात 2 बाद 137 धावा जमवित हा सामना 40 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी जिंकला. सलामीचा फलंदाज माझ सदाकतने 47 चेंडूत 4 षटकार 7 चौकारांसह नाबाद 79 धावा झोडपताना मोहम्मद नईमसमवेत सलामीच्या गड्यासाठी 33 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. नईमने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 14 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सदाकत आणि यासीर खान यांनी दुसऱ्या गड्यासाठी 39 धावांची भर घातली. यासीर खानने 9 चेंडूत 2 चौकारांसह 11 धहावा केल्या. सदाकत आणि मोहम्मद फैक यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. फैकने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. भारत अ संघातर्फे यश ठाकुर व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: भारत अ 19 षटकात सर्वबाद 136 (वैभव सूर्यवंशी 45, नमन धीर 35, आर्य 10, रमनदीप सिंग 11, हर्ष दुबे 19, अझीज 3-24, साद मसुद व सदाकत प्रत्येकी 2 बळी, उबेद शहा, डॅनियल, मुक्कीम प्रत्येकी 1 बळी). पाकिस्तान शाहीन्स 13.2 षटकात 2 बाद 137 (माझ सदाकत नाबाद 79, मोहम्मद फैक नाबाद 16, मोहम्मद नईम 14, यासीर खान 11, यश ठाकुर व सुयश शर्मा प्रत्येकी 1 बळी).