सूर्यकुमार मुंबई संघात दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरु असलेल्या सय्यद मुस्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि आंध्र यांच्यातील सामना 3 डिसेंबर रोजी खेळविला जाणार आहे. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यासाठी मुंबई संघात दाखल होणार आहे.
मध्यंतरी सूर्यकुमार यादवने आपल्याच घरातील एका समारंभामुळे तब्बल दोन आठवडे क्रिकेटपासून विश्रांती घेतली होती. आता तो पुन्हा मैदानात खेळताना दिसणार आहे. मुंबई संघाचे नेतृत्व सध्या श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आले असल्याने 3 डिसेंबरच्या सामन्यात सूर्यकुमार यादव अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघातून खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा टी-20 मालिकेत 3-1 अशा फरकाने पराभव केला होता. त्याचप्रमाणे 21 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतही सूर्यकुमार यादव मुंबई संघाकडून खेळणार आहे.