सूर्यकुमार टी-20 मानांकनात सातव्या स्थानी
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे स्थान पाच अंकांनी वधारले असून तो आता या यादीत सातव्या स्थानावर आहे.
सध्या न्यूझीलंडबरोबर सुरू असलेल्या टी-20 मालिकेत कर्णधार यादवने तीन सामन्यांत अनुक्रमे 32, नाबाद 82 आणि नाबाद 57 धावा झळकविल्या. भारताने हे सलग तीन सामने जिंकून न्यूझीलंडवर विजयी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. आता यादीतील तिसऱ्या स्थानासाठी भारताच्या अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यात जोरदार चुरस सुरू झाली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रायपूर येथे इशान किशनने 32 चेंडूत 76 धावा झोडपल्याने त्याने या यादीत 64 वे स्थान मिळविले आहे. शिवम दुबेचे स्थान 9 अंकांनी वधारले असून तो आता 58 व्या स्थानावर तर रिंकू सिंग 68 व्या स्थानावर आहे.
अफगाणने अलिकडेच दुबईत टी-20 मालिकेत विंडीजचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेत अफगाणचे सलामीचे फलंदाज इब्राहीम झेद्रान आणि रहिमतुल्ला यांची कामगिरी दर्जेदार झाली. या कामगिरीमुळे इब्राहीमने मानांकन यादीत 13 वे तर रहिमतुल्लाने 15 वे स्थान मिळविले आहे. विंडीज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात द.आफ्रिकेचा कर्णधार अॅडेन मार्करमने 47 चेंडूत नाबाद 86 धावांची खेळी केल्याने त्याने या मानांकन यादीत पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. विंडीजचा ब्रॅन्डॉन किंग 35 व्या तर न्यूझीलंडचा फिलीप्स 44 व्या स्थानावर आहे.
टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत अफगाणचा फिरकी गोलंदाज मुझीब उर रेहमान याने नववे स्थान मिळविले आहे. त्याचे स्थान पाच अंकांनी वधारले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह या यादीत 13 व्या स्थानावर तर बिश्नोई 19 व्या स्थानावर आहे. हार्दीक पंड्या 59 व्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या मानांकनात इंग्लंडच्या हॅरी ब्रुक आणि रूट यांच्या क्रमवारीत चांगली सुधारणा झाली आहे. लंकेविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 असा विजय मिळविला.या मालिकेत इंग्लंडच्या रुटने 184 धावा जमवित मानांकन यादीत 17 वे स्थान पटकाविले तर वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत फिरकी गोलंदाज आदिल रशीदचे स्थान सहा अंकांनी वधारले असून तो आता पाचव्या स्थानावर आहे. लंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने सात गडी बाद केले.