सूर्यकुमारला यादवला दुखापत
बांगलादेश मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताचा टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादव बुची बाबू स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. या स्पर्धेत तामिळनाडू व मुंबई यांच्यातील सामना कोईम्बतूर येथे खेळवला जात आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमारला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे आगामी दुलीप ट्रॉफीतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध मायदेशात कसोटी आणि टी 20 मालिका खेळायची आहे. भारत-बांगलादेश मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वीच सूर्यकुमार जखमी झाल्याने टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कोईम्बतूर येथे मुंबई आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेवन यांच्यातील सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार जखमी झाला. या सामन्यात सूर्या केवळ 38 चेंडूच मैदानावर राहू शकला आणि त्यानंतर तो दुखापग्रस्त झाला. दुखापतीनंतर सूर्याच्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुलीप करंडक स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सूर्या हा दुलीप ट्रॉफीमधील ‘सी’ संघाचा भाग आहे. मात्र, सूर्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो पुन्हा केव्हा मैदानात परतेल याबाबत कोणतीही माहिती नाही. आता तो मैदानात कधी परततो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गेल्या मोसमातील दुलीप ट्रॉफी फायनलपासून सूर्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला नाही. या दरम्यान त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया झाली होती आणि बराच काळ तो क्रिकेटपासून दूर होता. यानंतर तो वनडे वर्ल्डकप व टी 20 वर्ल्डकपमध्ये सहभागी झाला होता. श्रीलंका दौऱ्यानंतर सूर्याने बुची बाबू व दुलीप ट्रॉफीत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो या स्पर्धेतही सहभागी झाला पण आता दुखापतग्रस्त झाल्यामुळे दुलीप ट्रॉफीत तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
काही दिवसापूर्वी सूर्याने टीम इंडियाकडून कसोटी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. रेड बॉल क्रिकेटला नेहमीच माझे प्राधान्य राहिले आहे. मी मुंबईतील अनेक स्थानिक स्पर्धेत सहभागी झालो, तेव्हापासून मला कसोटी क्रिकेट आवडते. आता, टीम इंडियाकडून कसोटी खेळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते.