मुंबई रणजी संघात सुर्यकुमार, दुबे
वृत्तसंस्था / मुंबई
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दरम्यान 8 फेब्रुवारीपासून मुंबई आणि हरियाणा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळविला जाणार असून या सामन्यासाठी घोषित करण्यात आलेल्या 18 सदस्यांच्या मुंबई रणजी संघामध्ये सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सुर्यकुमार यादवकडे सोपविण्यात आले होते तर या संघात दुबेचाही समावेश होता. भारताने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. मात्र दुबेने या मालिकेतील मुंबईच्या शेवटच्या सामन्यात दर्जेदार कामगिरी केली. मात्र सुर्यकुमार यादवला या संपूर्ण मालिकेत फलंदाजीचा सूर मिळू शकला नाही. चालु वर्षीच्या रणजी क्रिकेट हंगामात दुबे आणि सुर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी 1 सामना खेळला आहे. मुंबई संघाने मेघालयचा एक डाव 456 धावांनी दणदणीत पराभव करुन उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मुंबईचा इलाईट अ गटात समावेश असून या गटातून बाद फेरी गाठणारा जम्मू काश्मिर हा दुसरा संघ आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये या स्पर्धेतील झालेल्या महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने मुंबईचे प्रतिनिधीत्व केले होते. गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या रणजी स्पर्धेतील जम्मू माश्मिरविरुद्धच्या सामन्यात शिवम दुबे, रोहीत शर्मा, यशस्वी जैस्वाल यांनी खेळ केला होता. पण जम्मू काश्मिरकडून मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. मुंबई संघाने आतापर्यंत 42 वेळा रणजी करंडक जिंकला आहे. मुंबई संघाला उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळण्यासाठी रोहटकला जावे लागणार आहे. क इलाईट गटात हरियाणाचा संघ आघाडीवर राहिल्याने तो उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे. या आगामी सामन्यासाठी मुंबई संघात नवोदित हर्ष तन्नाचा समावेश आहे.
मुंबई संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, रघु वंशी, अमोघ भटकळ, सुर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दीक तेमोरे, सुर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, मुलानी, कोटीयान, मोहीत अवस्थी, सिल्वेस्टर डिसोजा, रॉयस्टन डायस, अंकोलेकर आणि तन्ना