For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सूर्यघर योजना लाभदायक पण जागृतीचा अभाव

12:08 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
सूर्यघर योजना लाभदायक पण जागृतीचा अभाव
Advertisement

शहरात केवळ 400 ग्राहकांनी घेतला फायदा : भविष्यात सोलारचे वाढणार महत्त्व

Advertisement

बेळगाव : प्रत्येक घराला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर योजना मागील दोन वर्षांपासून सुरू करण्यात आली. ही योजना उत्तम असली तरी जागृतीच्या अभावाने बेळगावमध्ये तितकासा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. शहरात केवळ आजतागायत 400 नागरिकांनी आपल्या घरावर सूर्यघर योजनेंतर्गत सोलार रुफटॉप पॅनेल बसवून घेतले असून विजेच्या बाबतीत ते स्वयंपूर्ण झाले आहेत. बेळगाव शहरामध्ये घरगुती व व्यावसायिक असे एकूण 2 लाख 10 हजार ग्राहक आहेत. यापैकी 8 हजार घरगुती ग्राहक 200 युनिटपेक्षा अधिक विजेचा वापर करतात. ज्या घरांमध्ये विजेचा वापर अधिक होतो, त्या घरांसाठी पंतप्रधान सूर्यघर योजना महत्त्वाची ठरते. हेस्कॉमकडून सूर्यघर योजनेसंदर्भात जागृती तर करण्यात आली. परंतु, ती केवळ कन्नड भाषेत करण्यात आल्याने मराठी भाषिक ग्राहकांपर्यंत ती माहिती पोहोचू शकली नाही. त्यामुळे प्रतिसाद कमी मिळाला.

दक्षिण भागात सर्वाधिक सोलार पॅनेल

Advertisement

शहराच्या दक्षिण भागात सर्वाधिक रुफटॉप सोलार पॅनेल बसविलेले ग्राहक आहेत. सूर्यघर योजनेचा 200 ग्राहकांनी फायदा घेतला आहे. विशेषत: टिळकवाडी, भाग्यनगर, अनगोळ या परिसरातील ग्राहकांनी सर्वाधिक सोलार योजनेचा फायदा घेतला आहे. परंतु, शहराच्या उत्तर भागात मात्र या योजनेला तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेसाठी घरोघरी जागृती करणे गरजेचे बनले आहे.

सौरऊर्जा हा पारंपरिक ऊर्जास्रोताचा एक भाग असल्याने त्याचा अधिकाधिक वापर करणे भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे. विजेची निर्मिती ही धरणाचे पाणी तसेच कोळशावर अवलंबून असल्याने भविष्यात विजेच्या उत्पादनावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून सौरऊर्जेच्या वापरासाठी अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे बेळगाव शहरासह तालुक्यामध्ये कन्नडसह इंग्रजी व मराठीमध्येही सूर्यघर योजनेची जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.