For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सूर्याकडेच नेतृत्व, गिल उपकर्णधार

06:58 AM Aug 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
सूर्याकडेच नेतृत्व  गिल उपकर्णधार
Advertisement

आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा : बुमराह, सॅमसनचे कमबॅक : श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वालला मात्र वगळले

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक 2025 साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाचा संघ जाहीर केला. यंदाचा आशिया कप टी-20 स्वरूपात रंगणार असून टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या कर्णधार शुभमन गिललाही संघात स्थान मिळाले आहे तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनाही त्यात स्थान मिळाले आहे.

Advertisement

मंगळवारी सकाळी मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. सूर्याच्या नेतृत्वाखाली या संघात शुभमन गिलला संधी देण्यात आली असून त्याच्याकडेच उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर तिलक वर्मादेखील संघात कायम आहे. हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू संघाचा भाग आहेत. याशिवाय जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असतील.

बुमराहचे कमबॅक

गोलंदाजीत हर्षित राणा, बुमराह आणि अर्शदीप हे वेगवान गोलंदाज आहेत. तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव फिरकीपटू आहेत तर फिनिशरच्या भूमिकेसाठी रिंकू सिंगची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध शेवटच्या कसोटीत बुमराह दुखापतीमुळे खेळला नव्हता. पण तो आता दुखापतीतून सावरला असून आशिया चषकात तो आता खेळताना दिसणार आहे.

आशिया कपसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.

आशिया चषकात 8 संघ होणार सहभागी

यंदाचा आशिया चषक 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान अबूधाबी आणि दुबई येथे खेळला जाईल. यावेळी आशिया कप टी-20 स्वरूपात असेल. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच आठ संघांचा समावेश करण्यात आला आहे. या आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. आधी लीग स्टेज सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ 3 सामने खेळेल. त्यानंतर सुपर-4 फेरी होईल. यातील अव्वल संघांमध्ये 28 सप्टेंबर रोजी विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

आशिया चषकाचे संपूर्ण वेळापत्रक

9 सप्टेंबर - अफगाणिस्तान वि हाँगकाँग

10 सप्टेंबर - भारत वि यूएई

11 सप्टेंबर - बांगलादेश वि हाँगकाँग

12 सप्टेंबर - पाकिस्तान वि ओमान

13 सप्टेंबर - बांगलादेश वि श्रीलंका

14 सप्टेंबर - भारत वि पाकिस्तान

15 सप्टेंबर - यूएई वि ओमान

15 सप्टेंबर - श्रीलंका वि हाँगकाँग

16 सप्टेंबर - बांगलादेश वि अफगाणिस्तान

17 सप्टेंबर - पाकिस्तान वि यूएई

18 सप्टेंबर - श्रीलंका वि अफगाणिस्तान

19 सप्टेंबर - भारत वि ओमान

यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यरला वगळल्याने आश्चर्याचा धक्का

निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान न देऊन पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. शुभमन गिल टी-20 संघात परतला आहे, परंतु अय्यर निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये आणि त्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयसने दर्जेदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची आशिया कपसाठी निवड होईल, अशी अपेक्षा होती. परंतु निवडकर्त्यांनी त्याला पूर्णपणे डावलले आहे. विशेष म्हणजे, तुफान फॉर्ममध्ये असताना श्रेयसला बाहेर ठेवण्यात आल्याने अनेक माजी खेळाडूंनी निवड समितीवर टीका केली आहे. याशिवाय, यशस्वी जैस्वाल हा भन्नाट फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत त्याने दमदार फलंदाजी करत आपला फॉर्म आणि फिटनेस दाखवून दिला आहे. पण आशिया चषक हा टी-20 प्रकारात खेळवला जात आहे. यशस्वी चांगल्या फॉर्मात असला तरी त्याला अभिषेक शर्मामुळे संघात स्थान देता येणार नसल्याचे कारण आगरकर यांनी दिले आहे. यशस्वीची यामध्ये काहीही चूक नाही, पण संघात सलामीची जागा रिकामी नसल्यामुळे त्याला आशिया कपसाठी भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

चार खेळाडू राखीव

ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि रियान पराग यांना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. जर संघातील एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर या पाच खेळाडूंपैकी एकाला संधी मिळू शकते. पण तसे झाले नाही तर त्यांना फक्त वाट पहावी लागेल. टी-20 वर्ल्डकप संघात जागा मिळणेही या खेळाडूंना कठीण होईल.

Advertisement
Tags :

.