For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वराहाच्या मूत्रपिंडावर काढले नऊ महिने

06:35 AM Sep 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
वराहाच्या मूत्रपिंडावर काढले नऊ महिने
Advertisement

मूत्रपिंडे (किडनी) हा मानवी शरीरातील तीन सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मूत्रपिंडे निकामी झाल्यास रुग्णाला ‘डायालिसिस’वर ठेवावे लागते. शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे आणि रक्तातील अशुद्ध, तसेच विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचे कार्य मूत्रपिंडाला सातत्याने करावे लागते. त्यामुळे या अवयवाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे महत्वाचे असते. तरीही अनेकांना मूत्रपिंडाचा त्रास असतो आणि तो विकोपाला गेल्यास मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण (अन्य व्यक्तीचे सुस्थितीतील मूत्रपिंड रुग्णाच्या शरीरात बसविणे) करावे लागते. पण ही शस्त्रक्रिया अवघड असते. तसेच असे मूत्रपिंड उपलब्ध असणे कित्येकदा दुरापास्त ठरते. त्यामुळे बकरी किंवा वराह अशा प्राण्यांची मूत्रपिंडे काढून ती मानवी शरीरात बसविली जाऊ शकतात काय, यावर बऱ्याच वर्षांपासून संशोधन केले जात आहे.  या संदर्भात एक आशेचा किरण अमेरिकेतील एका घटनेतून दिसू लागला आहे.

Advertisement

अमेरिकेतील टिम अँड्य्रूज नामक रुग्णाची मूत्रपिंडे निकामी झाल्याने प्रत्यारोपण करण्याचा निर्णय झाला. तथापि, मूत्रपिंडे उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे वराहाची मूत्रपिंडे त्याच्या शरीरात प्रत्यारोपित करण्याचा प्रयोग करण्यात आला. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत. तथापि, मानवाच्या शरीरात प्राण्यांची मूत्रपिंडे फार काळ स्थिरावू शकत नाहीत, असे दिसून आले आहे. त्यामुळे आतापर्यंतचे असे प्रयोग फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. तरीही अँड्य्रूज यांना तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याने, मानवी मूत्रपिंडे मिळत नाहीत, तो पर्यंत अस्थायी व्यवस्था म्हणून वराहाची मूत्रपिंडे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्यारोपित करण्यात आली.

या मूत्रपिंडांच्या आधारावर अँड्य्रूज यांनी तब्बल 9 महिने तग धरला. मात्र, वराहाची मूत्रपिंडे त्यांच्या शरीरात कार्यरत रहावीत, यासाठी या मूत्रपिंडांमध्ये 59 प्रकारची जनुकीय परिवर्तने करावी लागली होती. ती गेल्यानंतर अँड्य्रूज यांच्या शरीराने ती बराच काळ स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढे मानवी मूत्रपिंडे उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे पुनर्प्रत्यारोपण करण्यात आले. पण, या प्रयोगावरुन प्राण्यांची मूत्रपिंडे मानवी शरीरात टिकू शकतात, हे दिसून आले. आता ती प्रदीर्घ काळ कशी सुस्थितीत राहतील, यावर मोठ्या प्रमाणात संशोधन केले जाणार आहे.

Advertisement

Advertisement

.