पहिल्या अपघातातून सावरले; दुसऱ्यांदा नियतीने डाव साधला, अचानक कुत्रे आडवे आल्याने.....
कळंबा : दोन वर्षांपूर्वी झालेल्या गंभीर अपघातातून सावरून पुन्हा कामाला लागलेले कळंब्यातील फरशी कामगार आनंदा गुरव (वय ३९) यांच्यावर काळाने पुन्हा घाला घातला. शुक्रवारी (दि. २५) गिरगाव फाटा परिसरात रस्त्यावर अचानक कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात गुरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी (दि. २८) सकाळी सव्वादहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दोन वर्षांपूर्वीही गुरव यांचा गंभीर अपघात झाला होता. चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या त्या अपघातात त्यांना मोठी दुखापत झाली होती. उपचारानंतर त्यांनी या संकटातून हळूहळू सावरत पुन्हा कामाला सुरुवात केली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते पूर्वीप्रमाणे काम करू लागले होते. त्यामुळे कुटुंबीयांनीही सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, शुक्रवारी पुन्हा अपघाताने त्यांचा पाठलाग केला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पाचगाव आश्रमशाळेजवळील जात असताना रस्त्यावर अचानक कुत्रे आडवे आले. त्यामुळे झालेल्या अपघातात गुरव गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.