For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यातील पीकहानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्या

09:35 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यातील पीकहानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्या
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांची तहसीलदारांना सूचना

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील पीकहानीचे सर्वेक्षण करून त्वरित भरपाई वितरित करावी, घरांच्या पडझडीबद्दल पोर्टलमध्ये माहिती द्यावी, भरपाई देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. जर सर्वेक्षणात तफावत किंवा दोष आढळून आल्यास तशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महसूल खात्याबरोबर विविध खात्यांच्या विकास आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पीकहानी संदर्भात संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात तफावत दिसून येत आहे. सर्वेक्षणाप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. सुमारे 20 हजार हेक्टर जमिनीतील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही अशा तक्रारी आहेत. अधिकाऱ्यांनी याकामी विलंब करू नये, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सर्वेक्षणानंतर भरपाईच्या पोर्टलमध्ये नमूद करून ज्या प्रस्तावांना परवानगी मिळाली आहे, तशा शेतकऱ्यांना अद्याप भरपाईची रक्कम मिळाली नाही. तांत्रिक दोष दूर करून त्वरित त्यांना भरपाई द्यावी. आधार-आरटीसी जोडणी पूर्ण करावी. नावातील तफावत व बँक खात्याला आधारलिंक नसल्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून रक्कम देण्यासाठी अडचणी येत आहेत. तशा शेतकऱ्यांना त्वरित आधार लिंक करण्याची सूचना द्यावी. इंडियन पोस्ट बँकेत खाते उघडण्यास सांगावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अथणी, गोकाक, चिकोडी, कागवाड, निपाणी तालुक्यात जास्तीत जास्त प्रमाणात आधार-आरटीसी जोडणी झाली नाही. काही तालुक्यात पीकहानीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले नाही. घरांच्या पडझडीसंबंधीही संपूर्ण माहिती संकलित झाली नाही. ही कामे त्वरित पूर्ण करावी. भरपाई देण्याचे काम तहसीलदारांच्या पातळीवर होते. कोणत्याही शेतकऱ्यांना भरपाई देण्यास विलंब केल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

Advertisement

येत्या आठवडाभरात सर्व तहसीलदारांनी आरटीसी व आधार जोडणीचे काम पूर्ण करण्याची सूचना तलाठ्यांना द्यावी. तलाठ्यांनी आपण काम करीत असलेल्या गावातच वास्तव्य करणे सक्तीचे आहे. महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना याआधीच दिली आहे. इंदिरा कँटीनची कामे व्यवस्थितपणे चालावीत. नव्या कँटीनसाठी जागेची समस्या असल्यास त्वरित संबंधित आमदारांच्या निदर्शनास आणून द्यावे. मुख्यमंत्र्यांच्या जनता दर्शनात गोकाक तालुक्यातील दोघा जणांनी दिलेल्या अर्जांची विल्हेवाट अद्याप झाली नाही. याकडेही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, प्रांताधिकारी श्रवण नायक, जिल्हा नगरविकास योजना कोशचे मल्लिकार्जुन कलादगी व स्वराज्य संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.