गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींचा सर्व्हे
दोन दिवसांत ३५० मिळकतींची तपासणी
न्यायालयाचे जैसे थे आदेश असताना बांधकाम झाल्याची तक्रार
कोल्हापूर
गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील जागेबाबत जैसे थे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतरही या परिसरात काहींनी बांधकामे करुन न्यायालयाच्या आदेशाचे भंग केले असल्याचा आरोप काही सामाजिक संस्थांनी केला. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित परिसरात सर्व्हे सुरु केला आहे. शनिवार आणि रविवारी ३५० मिळकतींचा सर्व्हे केला आहे. याबाबतचे अहवाल जिल्हाधिकारी न्यायालयात सादर करणार आहेत.
मनपाची गांधीनगर परिसरात जमीन आहे. या ठिकाणी काही बांधकामे केली आहेत. या जमिनीवर व तेथील बांधकामावर उचगाव ग्रामपंचायतीनेही आपला दावा सांगितला. सदरची जागा उचगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असल्याचा दावाही ग्रामपंचायतीने केला. याबाबत महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालयाने सदरची जागा महापालिकेची असल्याचे सांगितले होते. याविरोधात उचगाव ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३ मे २०१८ रोजी या जागेवरील बांधकामांबाबत जैसे थे आदेश दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही या ठिकाणी बांधकामे केल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना जैसे थे आदेशाचा भंग झाला आहे काय याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेवरील बांधकामांचा सर्व्हे करण्यासाठी ५ पथकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शहर रचनाकार विनय झगडे, उपशहररचनाकार एन. एस. पाटील, नगरपालिका प्रशासनाचे नागेश मुतकेकर, जिल्हापरिषदेचे अधिकारी, सिटीसर्व्हेचे अधिकारी, तसेच वडगाव आणि कागल नगपालिकांचे अधिकारी यांची मिळून ५ पथके तयार केली आहेत. शनिवार पासून या सर्व्हेला सुरुवात झाली. रविवारी सायंकाळपर्यंत ३५० मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला. संपूर्ण जागा आणि बांधकामांचा सर्व्हे झाल्यानंतर जिल्हाधिकारी याबाबतचा अहवाल तयार करुन तो न्यायालयात सादर करणार आहेत. दोन दिवस या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व्हेमध्ये कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, पद्मल पाटील, अभिलाषा दळवी, अवधुत नेर्लेकर, उमेश बागुल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी होते.