For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगलो एरियाच्या हस्तांतरणासाठी सर्वेक्षणाचा निर्णय

11:11 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगलो एरियाच्या हस्तांतरणासाठी सर्वेक्षणाचा निर्णय
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : कॅन्टोन्मेंट रहिवाशांचाही सहभाग

Advertisement

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण केले जाणार आहे. नागरी वसतीसह बंगलो एरिया हस्तांतरित करण्यासाठी संयुक्त समितीद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संयुक्त समितीसमोर ते बोलत होते. कॅन्टोन्मेंट बंगलो एरिया ही विस्ताराने मोठी आहे. त्यामुळे तिचे सर्वेक्षण करणे थोडे अवघड आहे. या प्रक्रियेत समितीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन सर्व काम पारदर्शकपणे पार पाडावे. कॅन्टोन्मेंट भागात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या जुन्या इमारतींवर मालकी आहे.

त्यांच्याकडे जमिनीवरील मालकीच्या नोंदी नाहीत. बोर्डमधील रस्ते, उद्याने, धार्मिकस्थळे यांचे सर्वेक्षण करून या जागा महानगरपालिकेकडे मोफत सुपूर्द करण्यासाठी पावले उचलावीत व सर्वेक्षणाचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कॅन्टोन्मेंट रहिवासी वसाहती, तसेच बंगलो एरिया हस्तांतरणाबाबत पुढील बैठकीत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला आमदार राजू सेठ, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, उपायुक्त रेश्मा तालीकोटी, मल्लिकार्जुन कलादगी, तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रहिवासी संघटनेचे सभासद उपस्थित होते.

Advertisement

नागरिकांना विश्वासात घेऊनच हस्तांतरण

कॅन्टोन्मेंट बोर्डने संरक्षण मंत्रालयाला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये बंगलो एरियाचा समावेश नव्हता. यामुळे नागरिकांनी प्रस्तावाला विरोध केला होता. नागरी वसाहतींसोबत बंगलो एरियाही महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी नागरिकांची आहे. याबरोबरच इतर जागाही हस्तांतरित करण्याबाबत आपली संरक्षण मंत्रालयाकडे मागणी आहे. नागरिकांना विश्वासात घेऊनच हस्तांतरणाची प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती आमदार राजू सेठ यांनी बैठकीदरम्यान दिली.

Advertisement
Tags :

.