चिपळुणात डास निर्मूलनासाठी सर्वेक्षण सुरू
चिपळूण :
शहरात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत किटकजन्य पारेषण काळापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. 6 पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू असून डास निर्मूलनासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप या आजारांची साथ उद्भवू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिऊद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, मुख्याधिकारी विशाल भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती व मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार गृहभेटी देऊन आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका सर्वेक्षण करीत आहेत. पिंप, रांजण, फ्रीज, पाणी साठवणुकीची भांडी तसेच डासांच्या अळ्या आढळून आलेली भांडी रिकामी करण्यात येत आहेत. वापरात नसलेले, साठलेले पाणी, गटारांमध्ये टेमिफॉस या किटकनाशक औषधांचा वापर करण्यात येत आहे. डासापासून होणाऱ्या आजारांबाबत नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. डास उत्पत्तीची स्थाने निश्चित करुन तेथे गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाचे निरीक्षक म्हणून तालुका आरोग्य पर्यवेक्षक एस. वाय. जानवलकर, एम. के. जाधव काम पाहत आहेत.