सर्वे भद्राणि पश्यन्तु!
आजपासून पराभवनाम संवत्सराला प्रारंभ होत आहे. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. आपणा सर्वांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा दिवस. साडेतीन मुहुर्तांपैकी एक संपूर्ण दिवस. आपण या दिवसाची सुऊवात कडुलिंबाच्या चटणीच्या प्राशनाने करीत असतो. संदेश एवढाच असतो की, थोडं कडू खा, आपल्या आरोग्याची काळजी घेत जा आणि नंतर गोड खूपच खायचं आहे. जेवढे आपण गोड खाणार, तेवढेच गोड देखील बोलू. सर्वांशी गोड वागू, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाऊ. ही या उत्सवाची, सणाची मुख्य भावना आहे. दारोदारी आपण गुढी उभारणार आहोत. ही गुढी आपल्या ऐक्याची असू द्या. आपल्या देशाच्या भरभराटीची असू द्या. ही गुढी यशाची असू द्या, ही गुढी समर्पित भावनेची असू द्या. गुढीपाडवा येईल आणि जाईलही. नववर्षाची सुऊवात खूप चांगल्या गोष्टीने व्हावी, अशी आपल्याला इच्छा असते आणि ती असावी. सकारात्मक भावनेने पुढे जाल तर आपल्या बऱ्याच गोष्टी शक्य होतील, साध्य होतील. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच एक चैतन्याचा, मांगल्याचा दिवस. नूतन वर्षाचा पहिला दिवस आपल्याला काहीतरी नव्याने प्रवास सुरू करा, असा संदेश देत असतो. वसंताने या धरित्रीवर चैतन्याचा वर्षाव केलेला आहे. कोकिळेने पंचमसूर लावलेला आहे. कुठेतरी राग वसंत गात, कलाकार आपली कला पेश करीत असतो आणि वनराई नव्या कोवळ्या पालवीने, फुलांनी, फळांनी बहरलेली असते. मांगल्याचे दिवस सुरू झालेले आहेत, हे आपल्याला निसर्ग सांगत असतो आणि आजच्या या पवित्र दिनी वसंत ऋतू, आपल्यासमोर खूप नवीन आव्हाने आहेत परंतु तू सुखी राहा, इतरांना देखील सुखी कर, हा संदेश देत असतो. जुने विसरून जा आणि नव्याला सामोरे जा, असा मंत्र घेऊन आजच्या या पवित्र दिनी आपल्याला नव्या दिनाला प्रारंभ करायचा आहे. संपूर्ण जगामध्ये आज जी अस्थिरता माजलेली आहे, प्रत्येक राष्ट्र एकमेकांच्या उरावर येऊन बसले आहे. तिसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झालेला आहे. जग एका वेगळ्याच दिशेने वाटचाल करीत आहे. अशावेळी भारत मात्र शांत आहे. आपली वाटचाल अशा दिशेने व्हावी की, इतरांना देखील आपल्याबद्दलचा आदर वाटावा. आज अनेक राष्ट्रे आपापसात संघर्ष करीत आहेत. एकमेकाला संपविण्यासाठी अस्त्रs सोडत आहेत. माणसे मरत आहेत, मारली जात आहेत आणि एकमेकांची माणसे, नेते मारल्याचा असुरी आनंद काहीजण घेत आहेत. अशावेळी भारत मात्र शांततेचे प्रतीक म्हणून पुढे जात आहे कारण भारताला स्वत:ची सांस्कृतिक परंपरा आहे. स्वत:ची संस्कृती आहे. स्वत:चा इतिहास आहे आणि भारताला राम, कृष्णसारखे महापुऊष लाभले. इथे गौतम बुद्धांचा देखील जन्म झालेला आहे. अशी ही पवित्र भूमी आहे, जी साऱ्या जगाला एकतेचा संदेश देत आहे. आपल्या धर्माचे ते सार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी, ‘हे विश्वची माझे घर’, अशी उपमा दिलेली आहे. संपूर्ण जगाकडे भारतीय आणि भारतातील संत, हे विश्व म्हणजे आपले पवित्र घर आहे, अशा विशाल दृष्टिकोनातून संदेश देतात, उपदेश देतात. भारतीय तत्त्वज्ञान आपल्याला ‘वसुधैव कुटुम्बकम’ असा सुंदर संदेश देते. जगाला एकत्रित आणण्याचे सामर्थ्य भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आहे आणि आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत आहे. म्हणजे त्याची सुऊवात झालेली आहे. इराणला एकाकी गाठून अमेरिका आणि इस्रायलने त्यांचे अनेक नेते, सैनिक मारले. अनेक तेल विहिरी तसेच तेलाचे साठे उद्ध्वस्त केले. एकमेकांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या. नेत्यांची हत्या केली आणि प्रचंड प्रमाणात पायाभूत सुविधा नष्ट केल्या. इमारती उडविल्या. हे सर्व काही विद्ध्वंसक वृत्तीने केले जात आहे. यामध्ये चूक कोणाची, हे सर्वांना माहीत आहे परंतु हे युद्ध कोणासाठी? आज आपण जेव्हा भारतात गुढीपाडवा साजरा करीत आहोत, चैतन्याचा आणि मांगल्याचा दिवस आहे आणि अशावेळी हे जे युद्ध सुरू आहे, ते कोणाच्याच भल्यासाठी नाही. अनेक राष्ट्रे विद्ध्वंसाच्या दिशेने जात आहेत. एकमेव भारत शांतीचा संदेश देत आहे. युद्ध जरी आखातात असले तरी त्याची झळ ही आपल्याला देखील बसत आहे. हे युद्ध टाळता आले असते परंतु प्रचंड ‘इगो’ने युद्धाच्या आगीमध्ये तेल ओतले आणि त्याचा केवळ भडकाच उडाला नाही तर त्यात अनेक देश होरपळून निघाले. अनेक निरपराध जीवांनी प्राण गमावले. युद्धात कोण जिंकेल आणि कोण पराजित होईल, हे काळ ठरवेल. यंदाचे वर्ष हे पराभवनाम संवत्सर आहे परंतु पराभव याचा अर्थ चुकीचा ठरू नये व तसे कोणी विचारातही घेऊ नये. प्रत्यक्षात हे नववर्ष नीती, सत्य आणि चांगल्या मूल्यांच्या विजयासाठीचे आहे. अनिती आणि भ्रष्टाचार दृष्टवृत्ती आणि स्वार्थीपणाचा पराभव, हा निश्चित आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे त्या नावाप्रमाणे दुष्ट प्रवृत्तींचा पराभव करणारे ठरणार आहे. पंचांगकर्त्यांनी मात्र सामाजिक व राजकीय क्षेत्रात फार मोठ्या बदलांचे संकेत दिलेले आहेत. तथापि त्यातूनही वाईट प्रवृत्तींचा नाश होईल, असेही म्हटलेले आहे.
सर्वस्तरतु दुर्गाणि, सर्वो भद्राणि पश्यन्तु। सर्व: कामानवाप्नोतु, सर्व: सर्वत्र नन्दतु।।
म्हणजेच संकटे किंवा कठीण प्रसंगावर सर्वांना विजय मिळावा. सर्वांना चांगले दिवस पाहायला मिळावेत. सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि सर्वजण सर्वत्र आनंदी असावेत, असा त्याचा भावार्थ आहे. एका बाजूला अर्धे जग अस्वस्थ आहे, जाळ-पोळ, हिंसा, हत्या वाढत आहेत आणि जगाच्या दुसऱ्या बाजूला रामाचा जयघोष चालू आहे. नागरिक घरावर गुढ्या उभारून मांगल्याचा दिवस, गुढीपाडवा साजरा करीत आहे, अशी स्थिती आहे. आपल्याला देखील फार चिंता आहे. हे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात आणणे, हे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक आहे. आपण थोडे चिंताग्रस्त देखील आहोत. उद्या काय होईल, आपल्याला माहीत नाही. तरी देखील आपल्या धर्माने, आपल्या संस्कृतीने, आपल्या परंपरेने आपल्याला फार मोठी शिकवण दिलेली आहे. जगाच्या कल्याणासाठी आपण माणूस म्हणून नेहमी सक्रिय राहावे, चांगले विचार घेऊन पुढे जावे, सकारात्मकदृष्ट्या पाऊल टाकावे आणि संपूर्ण जगाला कवेत घ्यावे, हे विचार आपल्याला संतांनी दिलेले आहे. हे नूतन संवत्सर आपल्याला दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवून देणारे आहे. अधर्माने वागणाऱ्यांचा पराभव करणारे, हे पराभव नामसंवत्सर आहे. त्यासाठीच
सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दु:खभाग्भवेत्।।
हा संदेश घेऊन आपल्याला आपल्या धर्माने सर्वजण सुखी होतील, सर्व रोगमुक्त होत, सर्वांना चांगल्या मंगल गोष्टी अनुभवायला मिळाव्यात आणि कोणीही दुखी होऊ नये एवढीच सर्वांसाठी प्रार्थना.