सुरुची, नीरज, सम्राट राणाची चमक
वृत्तसंस्था/ डेहराडून
येथे सुरु असलेल्या गट ए नेमबाजांसाठीच्या राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत सुरुची इंदरसिंग, नीरजकुमार आणि सम्राट राणा यांनी चमकदार कामगिरी केली.
या निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुरुची इंदरसिंगने ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरला मागे टाकत विजेतेपद मिळविले. तिने या क्रीडा प्रकारात 245.6 गुणासह पहिले स्थान तर मनू भाकरने 244.5 गुणासह दुसरे तसेच अनुभवी राही सरनोबतने 223.1 गुणासह तिसरे स्थान मिळविले. नेमबाजीच्या या क्रीडा प्रकारात पात्र फेरीमध्ये सुरुचीने आघाडीचे स्थान घेतले होते.
भारतीय नौदलाचा नेमबाज नीरजकुमारने या स्पर्धेत दुहेरी विजेतेपद मिळविले. त्याने पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात हे यश प्राप्त केले. तसेच रविवारी झालेल्या पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सम्राट राणाने 241.7 गुणासह पहिले स्थान मिळविले. सौरभने 241.5 गुणासह दुसरे तर आदित्य मलराने 217.8 गुणासह तिसरे स्थान घेतले. नीरजकुमारने पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात 463 गुणासह पहिले स्थान मिळविले. ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर दुसरे स्थान तर अखिल शेरॉनने 448.8 गुणासह तिसरे स्थान घेतले. या क्रीडा प्रकारात पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे याला 438.4 गुणासह चौथ्या स्थानावर रहावे लागले. ही चाचणी स्पर्धा सोमवारी समाप्त होणार आहे.