महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिल्किस बानो प्रकरणातील 11 आरोपींचे आत्मसमर्पण

06:48 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींनी रविवारी रात्री उशिरा गोध्रा कारागृह अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. 2002 च्या गुजरात दंगलीदरम्यान घडलेल्या बिल्किस सामूहिक बलात्काराच्या दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 8 जानेवारी रोजी रद्द केला होता. या प्रकरणाशी संबंधित याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने सर्व दोषींना दोन आठवड्यांच्या आत म्हणजेच 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वांनी शरणागती पत्करली आहे.

Advertisement

आत्मसमर्पण केलेले सर्व 11 दोषी दोन वाहनांतून रविवारी रात्री दाहोद जिल्ह्यातील सिंगवाड येथून गोध्रा उपकारागृहात पोहोचले. दोषींमध्ये राधेश्याम शाह, जसवंत नई, गोविंद नई, केसर वोहनिया, बाका वोहनिया, राजू सोनी, रमेश चंदना, शैलेश भट्ट, बिपिन जोशी, प्रदीप मोढिया आणि मितेश भट्ट यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.  गुजरात सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात खुद्द बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (19 जानेवारी) बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची आत्मसमर्पण कालावधी वाढवण्याची याचिका फेटाळली होती. दोषींनी आत्मसमर्पणासाठीची मुदत वाढवण्याची मागणी करताना दिलेली कारणे तकलादू असल्याचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते.

देशभरात गाजलेल्या बहुचर्चित बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने  गुजरात सरकारला दणका देताना 11 दोषींना मुदतीपूर्वी तुरुंगातून सोडण्याचा व शिक्षा माफ करण्याचा घेतलेला निर्णय रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयाने ‘शिक्षा गुन्हेगारी थांबवण्यासाठी दिली जाते, पीडितेच्या दु:खाचीही काळजी घ्यावी लागेल’ अशी टिप्पणी करत गुजरात सरकारला चपराक दिली होती. तसेच गुजरात सरकारला दोषींची सुटका करण्यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार नाही. राज्य सरकारने आपल्या सत्ता व अधिकारांचा दुरुंपयोग केला आहे, असे खडे बोलही खंडपीठाने सुनावले होते. निकालानंतर बिल्किस बानोच्या घरी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.

गोध्रा घटनेनंतर 3 मार्च 2002 रोजी गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. दंगलीदरम्यान दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्मयातील रणधीकपूर गावात संतप्त जमाव बिल्किस बानोच्या घरात घुसला. दंगलखोरांपासून वाचण्यासाठी बिल्किस  आपल्या कुटुंबासह शेतात लपून बसली होती. तेव्हा ती 21 वर्षांची होती आणि ती 5 महिन्यांची गर्भवती होती. बिल्किस बानोवर दंगलखोरांनी अत्याचार केला होता. तिची आई आणि इतर तीन महिलांवरही बलात्कार झाला. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील 17 पैकी 7 जणांचा मृत्यू झाला होता. 6 लोक बेपत्ता झाले असून त्यांचा थांगपत्ताच लागलेला नाही. या हल्ल्यातून फक्त बिल्किस बानो, एक पुरुंष आणि एक तीन वर्षांचा मुलगा बचावला होता.

2008 मध्ये दोषींना जन्मठेप

2004 मध्ये सामूहिक बलात्काराच्या आरोपींना अटक करण्यात आली होती. जानेवारी 2008 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा कायम ठेवली होती. आरोपींना प्रथम मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आणि नंतर नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. तब्बल 9 वर्षानंतर सर्वांना गोध्रा सबजेलमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर गुजरात सरकारने घेतलेल्या निर्णयाअंती 15 ऑगस्ट 2022 रोजी त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व दोषींना पुन्हा तुरुंगात परतावे लागले आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article