युरियासाठी सुरजेवालांचे केंद्रीय कृषीमंत्र्यांना साकडे
पत्राद्वारे शिवराज सिंग चौहान यांना विनंती : कर्नाटकात 3.36 लाख मेट्रिक टन खताची कमतरता
बेंगळूर : राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्य सचिव व कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी कर्नाटकला 3.36 लाख मेट्रिक टन युरिया खताचा त्वरित पुरवठा करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांना पाठविले आहे.भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. कर्नाटकात मान्सून लवकर सुरू झाला. सरासरीपेक्षा 3 टक्के जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरण्या अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाल्या आहेत. कर्नाटकाने 2025-26 या वर्षासाठी 114.40 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
160.68 लाख टन आहार धान्य व तेलबियांचे उत्पादनाचे लक्ष्य आहे. खरीप हंगामासाठी पेरणीचे लक्ष्य 82.50 लाख हेक्टर होते मात्र, 81.85 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे, असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. खरीप हंगामात विविध रासायनिक खतांची मागणी 26.77 लाख मेट्रिक टन आहे. युरियाची 3.36 लाख मेट्रिक टन कमतरता आहे. राज्यांना आवश्यक असलेल्या खतांचा पुरवठा करण्याची पूर्णपणे जबाबदारी केंद्र सरकारची आहे. कर्नाटकच्या मागणीनुसार केंद्र सरकारने खत पुरवठा केलेला नाही, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.
युरियाचा पुरवठा 50 टक्क्यांनी कमी
यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कर्नाटकला पुरवठा करण्यात येणारा 3.36 लाख मेट्रिक टन युरिया प्रलंबित आहे. केंद्र सरकारकडून कमी खत पुरवठा झाल्याने कर्नाटकात खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर्षी युरियाचा पुरवठा 50 टक्क्यांनी कमी झाला आहे, असे ते म्हणाले. कर्नाटकातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पुरवठा करण्यात येणारा युरिया खत लवकरात लवकर पुरवावा, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.