सुरेश प्रभू यांची ‘ब्लूमबर्ग’वर नियुक्ती
न्यू इकॉनॉमी अॅडव्हायझरी बोर्डवर एकमेव भारतीय
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी (बीएनई) अॅडव्हायझरी बोर्डवर नियुक्ती करण्यात आली आहे. या बोर्डवर निवड होणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत. अमेरिकेचे माजी वाणिज्य सचिव जीना रायमोंडो आणि इटलीचे माजी पंतप्रधान मारियो द्राघी हे ‘बीएनई’च्या नवीन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय इतर सदस्यांमध्ये इंडोनेशियाचे माजी अध्यक्ष जोको विडोडो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ आणि सिंगापूरचे हवामान कृती राजदूत रवी मेनन यांचा समावेश आहे. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या भविष्यकालीय योजनांबाबत संवाद आणि वादविवादाचे व्यासपीठ आहे.
सुरेश प्रभू हे सहावेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी वाजपेयी सरकार आणि पंतप्रधान मोदींच्या पहिल्या दोन कार्यकाळात अनेक विभाग सांभाळले आहेत. त्यांनी उद्योग, वीज, पर्यावरण व वन, रेल्वे, नागरी विमान वाहतूक, वाणिज्य व उद्योग, खते व रसायने अशी अनेक कॅबिनेट विभागांची जबाबदारी सांभाळली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी जी-7 आणि जी-20 मध्ये पंतप्रधानांचे शेर्पा म्हणूनही काम केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारच्या अधिकृत अजेंड्याला मूर्त स्वरुप देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.