For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत सुरश्री संगीत महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ

07:00 PM Feb 01, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत सुरश्री संगीत महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ
Advertisement

                                      मधुरा दातार यांच्या 'स्वरमधुरा' मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध

Advertisement

सांगली : सांगलीच्या सांस्कृतिक विश्वाची श्रीमंती वाढवणाऱ्या दोन दिवसीय सुरश्री संगीत महोत्सवाचा शनिवार ३१ जानेवारी रोजी कल्पद्रुम क्रीडांगणावर दिमाखात प्रारंभ झाला. दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करत उपस्थितांनी क्षणभर मौन पाळले.

प्रारंभी जिल्हाधिकारी अशोक काकडे,  शरदिनी काकडे, सुरश्री संगीत फाउंडेशनचे संचालक श्रीपाद चितळे व सौ. अनघा चितळे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन पारपडले. यावेळी मान्यवरांनी सुरश्री संगीत फाउंडेशनच्या सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले. महोत्सवाची सुरुवात प्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा दातार व त्यांच्या वाद्यवृंदाने सादर केलेल्या 'स्वरमधुरा' या मैफिलीने झाली.

गायक अजित विसपुते यांनी विठुरायाच्या 'विठुचा गजर हरिनामाचा, झेंडा रोविला' या अभंगाने भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर देव देव्हाऱ्यात नाही, विठ्ठल आवडी प्रेम भावो यांसारख्या अभंगांनी रसिकांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली.यानंतर मधुरा दातार यांनी सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले व शांता शेळके लिखित 'ऋतू हिरवा... ऋतू बरवा...हे भावगीत सादर करत मैफिलीची उंची सुरुवातीलाच वेगळ्या स्तरावर नेली. संगीत मानापमान नाटकातील 'युवतीमना दारुण रण' हे नाट्यपद सादर करत मधुरा दातार यांनी नाट्यसंगीताचा ठसा उमटवला. कार्यक्रमात मधुरा दातार यांना सहगायक म्हणून अजित विसपुते यांनी साथ दिली. तबल्यावर प्रसाद जोशी, संवादिनीवर मंदार गोडसे, वेस्टर्न व रिदमवर ऋतुराज भोरे, सिंथेसायझरवर विवेक परांजपे यांनी साथसंगत केली. निवेदन सुप्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी यांनी केले.

Advertisement

यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे,  शीतल घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्यासह संगीतप्रेमी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.