For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे काय होणार?’; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, सरसकट कर्जमाफीची मागणी

06:30 PM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे काय होणार ’  सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल  सरसकट कर्जमाफीची मागणी
Advertisement
पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणींवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित करत, ‘या रकमेतून शेतकऱ्यांच्या समस्या कशा सुटणार?’ असा सवाल त्यांनी केला. इंदापूर तालुका पूर्णपणे दुष्काळग्रस्त असेल, तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सुप्रिया सुळे सध्या पुरंदर तालुक्यातील राजुरी गावात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून पाणीटंचाई, रोजगार हमी योजनेची रखडलेली कामे, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि सरकारी मदतीचा आढावा घेतला.

Advertisement

‘सरकारकडून गरिबांची चेष्टा’

दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगताना सुळे म्हणाल्या की, अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आणि महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. लोकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढत आहे. शिक्षणात गुणवत्ता दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शुल्क भरण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सरकारकडून दुष्काळग्रस्तांना पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली जात असेल, तर त्या रकमेतून नेमके काय साध्य होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही मदत अपुरी असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. सरकार गरिबांची चेष्टा करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

‘दुष्काळावर राजकारण नको, सरकारला सहकार्य करण्याची तयारी’

दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा आपला हेतू नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा आणि परिस्थिती सुधारावी, यासाठी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी सरकारने प्रत्यक्ष परिस्थितीची दखल घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्रे दिल्याचा दावा

दुष्काळाच्या नियोजनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना दोन पत्रे पाठवली होती, असे सुळे यांनी सांगितले. दुष्काळाचा सामना कशा पद्धतीने करावा आणि आवश्यक उपाययोजना कशा राबवाव्यात, याबाबत या पत्रांमधून सूचना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असल्याचे दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरसकट कर्जमाफीची मागणी

इंदापूर तालुका पूर्णपणे दुष्काळग्रस्त असल्याचे सरकार मानत असेल, तर तेथील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांवरील ताण वाढत असल्याने केवळ मर्यादित आर्थिक मदत पुरेशी ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.