अजित पवार यांना ‘सर्वोच्च’ दिलासा
विधानसभा निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हाचा उपयोग करण्यास अनुमती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला आहे. या पक्षाला विधानसभा निवणुकीत मूळच्या ‘घड्याळ’ या चिन्हाचा उपयोग करण्यास न्यायालयाने अनुमती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हे चिन्ह उपयोगात आणू देऊ नये, अशी मागणी करणारी शरद पवार गटाची याचिका फेटाळण्यात आली. मात्र, या चिन्हाचा उपयोग करण्यासाठी एक अटही न्यायालयाने लागू केली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विरुद्ध निर्णय दिला, तर हे चिन्ह पक्षाला गमवावे लागू शकते, हे या पक्षाने स्पष्ट केले पाहिजे, अशी अट सर्वोच्च न्यायालयाने लागू केली आहे. त्यामुळे प्रचार करताना हे ‘डिस्क्लेमर’ या पक्षाला द्यावे लागणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी ही अट लागू झाली आहे.
प्रकरण काय आहे...
मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील चाळीसहून अधिक आमदारांसह बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपल्या गटाचा पाठिंबा राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला दिला होता. तसेच या सरकारमध्ये मंत्रिपदेही मिळविली होती. नंतर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपलाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे प्रतिपादन केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने याप्रकरणी सुनावणी करुन त्यांचाच गट हा खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय दिला. तसेच मूळ पक्षाचे घड्याळ हे चिन्ह या पक्षाला दिले. आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार यांचा गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, अद्याप सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केलेली नाही. मधल्या काळात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवार यांचाच राष्ट्रवादी पक्ष खरा असल्याचे स्पष्ट करत त्याची वैधता मान्य केली होती आणि आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही, असा निर्णय दिला होता. विधानसभा निवडणुकीची घोषणा महाराष्ट्रात झाल्यानंतर शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात याचिका सादर केली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह उपयोगात आणण्यास स्थगिती द्यावी अशी शरद पवार गटाची मागणी होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती मान्य केली नाही.
निर्णय कधी दिला जाणार...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणाच्या आधी अशाच प्रकारचे प्रकरण शिवसेनेच्या संदर्भात घडले आहे. मूळच्या शिवसेनेचेही 40 हून अधिक आमदार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाहेर पडले होते आणि या गटाने भारतीय जनता पक्षाशी युती करुन महाराष्ट्रात सरकार स्थापन केले होते. या प्रकरणातही आमदार अपात्रतेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिंदे यांच्या शिवसेनेलाही केंद्रीय निवडणूक आयोगाने वैध मानले असून धनुष्यबाण हे मूळचे चिन्ह दिले आहे. या दोन्ही प्रकरणांवर कदाचित महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर विस्तृत निर्णय दिला जाईल, अशी शक्यता आहे.
परिणाम काय होणार?
सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ हे चिन्ह उपयोगात आणण्याची सशर्त अनुमती दिल्याने या पक्षाला नव्या चिन्हाचा प्रचार करावा लागणार नाही. आता वेळ कमी असल्याने नव्या चिन्ह मतदारांच्या मनात ठसविण्यासाठी या पक्षाला बरेच प्रयत्न करावे लागले असते. घड्याळ हे चिन्ह मतदारांच्या परिचयाचे आहे. परिणामी, हेच चिन्ह राखले गेल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा विधानसभा निवडणुकीत लाभ शक्य आहे.