दलित विद्यार्थ्याला ‘सर्वोच्च’ दिलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयआयटीत प्रवेश मिळाल्यानंतर शुल्क वेळेवर भरता न आल्याने शिक्षणाची संधी हुकलेल्या दलित विद्यार्थ्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आपल्या विशेषाधिकाराचा उपयोग करुन, धनबाद येथील आयआयटी महाविद्यालयाच्या प्रशासनाला सोमवारी दिला. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून तो आता आयआयटीमधील शिक्षण पूर्ण करु शकणार आहे.
अतुल कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला धनबाद येथील आयआयटी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. मात्र, त्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आयआयटी अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करुन पैसा गोळा करावा लागला. पैसे गोळा करण्यात वेळ गेल्याने तो पूर्वनिर्धारित वेळेत पैसे भरु शकला नाही. शुल्क भरण्याची वेळ 24 जून 2024 या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होती. त्या दिवशी 4.45 पर्यंत त्याच्या आईवडिलांनी आवश्यक तेव्हढे पेसे जमा केले. त्याने ते पैसे ऑनलाईन भरण्याचा प्रयत्न केला. तथापि, सर्व्हर डाऊन झाल्याने त्याला वेळेत पैसे भरता आले नाहीत.
संधी हुकण्याची वेळ
नियमानुसार पूर्वनिर्धारित वेळेत शुल्क भरले न गेल्याने त्याचा प्रवेश रद्द करण्यात आला. त्यामुळे त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याला न्याय देण्यासाठी जे करता येईल ते केले जाईल, असे मागच्या सुनावरणीच्या वेळी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी त्याच्या याचिकेवर अंतिम सुनावणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलासा देण्यासाठी आपला विषेशाधिकार उपयोगात आणला. हा विषेशाधिकार सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 142 अनुसार मिळाला आहे. या अधिकाराअंतर्गत सर्वोच्च न्यायालय विशिष्ट परिस्थिती सर्व प्रचलित नियम टाळून संबंधित व्यक्तीला दिलासा देऊ शकते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने याच अधिकाराचा उपयोग करुन आयआयटीला आदेश दिला आहे.
गुणवान विद्यार्थ्याला दिलासा आवश्यक
अतुल कुमार हा विद्यार्थी बुद्धीमान असल्याचे दिसून येते. अशा विद्यार्थ्यावर केवळ एका नियमाचा भंग झाला म्हणून त्याच्या महत्वाकांक्षेवर पाणी सोडण्याची वेळ येणे योग्य नाही. त्यामुळे हे प्रकरण विषेशाधिकाराचा उपयोग करण्यास योग्य आहे. या विद्यार्थ्याला धनबाद आयआयटीने त्याच बॅचमध्ये प्रवेश द्यावा, ज्या बॅचमध्ये त्याला प्रथम प्रवेश मिळाला होता. त्याच्यासाठी या बॅचमध्ये एक विशेष जागा निर्माण करण्यात यावी, जेणेकरुन ज्यांना यापूर्वीच प्रवेश मिळाला आहे, त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. केवळ 17 हजार 500 रुपयांसाठी एका गुणी विद्यार्थ्याची हानी होऊ नये, असे सर्वोच्च न्यायलयाने स्पष्ट केले.
विद्यार्थ्याला आनंद
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अतुल कुमार याने अतिशय आनंद व्यक्त केला आहे. ‘मला माझे जीवन परत मिळाले आहे. या संधीचा लाभ मी माझ्या कष्टाने घेणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माझ्यासाठी अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी न्यायव्यवस्थेचा आभारी आहे. अशी प्रतिक्रिया अतुल कुमार याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यक्त केली आहे.