For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उदयनिधी स्टॅलिन यांना ‘सर्वोच्च’ फटकार

06:22 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
उदयनिधी स्टॅलिन यांना ‘सर्वोच्च’ फटकार
Advertisement

सनातन धर्मावरील वादग्रस्त वक्तव्य अंगलट : पुढील आठवड्यात होणार सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्यं करणारे द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सोमवारी जोरदार फटकारले आहे. न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर उदयनिधी यांच्याकडून दाखल याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. उदयनिधी हे एक राजकीय नेते असून त्यांनी स्वत:च्या अधिकारांचा दुरुपयोग केला असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे.

Advertisement

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, बिहार, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकात स्वत:च्या विरोधात नोंद एफआयआरना एकत्र जोडण्यात यावे अशी मागणी याचिकेद्वारे केली होती.

उदयनिधी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्माच्या प्रचार-प्रसार स्वातंत्र्याच्या अधिकाराचा दुरुपयोग केला आहे. अशा स्थितीत उदयनिधी याच्याकडून अनुच्छेद 32 अंतर्गंत सर्वोच्च न्यायालयाकडून दिलाशाची मागणी केली जात आहे.  याचे परिणाम काय असू शकतात हे ते जाणत नाही का अशी विचारणा न्यायाधीश दत्ता यांनी उदयनिधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सुनावणीवेळी केली आहे.

उदयनिधी यांच्या टिप्पणींना योग्य ठरवित नाही. द्रमुक नेता 6 राज्यांमध्ये एफआयआरचा सामना करत आहे. याचा अर्थ मला 6 उच्च न्यायालयांसमोर हजर रहावे लागणर आहे. मी यामुळे सातत्याने व्यग्र राहणार असल्याचा युक्तिवाद सिंघवी यांनी खंडपीठासमोर केला. यावर न्यायाधीश दत्ता यांनी याचिकाकर्त्यांच्या टिप्पणीवर उदयनिधी हे सर्वसामान्य व्यक्ती नाहीत, ते एक मंत्री आहेत, त्यांना अशाप्रकारच्या वक्तव्यांचा परिणाम माहित असायला हवा असे म्हटले.

नोंद झालेल्या खटल्यांच्या गुणवत्तेवर मी टिप्पणी करत नाही. परंतु याचा प्रभाव एफआयआर एकत्रित करण्याच्या मागणीवर पडू नये असा युक्तिवाद सिंघवी यांच्याकडून करण्यात आला. सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या पूर्वीच्या आदेशांचा दाखला देत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये क्षेत्राधिकार निश्चित व्हायला हवेत असे म्हटले. उदयनिधी यांच्या वकिलाचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यासाठी टाळली आहे.

काय आहे प्रकरण?

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना ‘मलेरिया’ आणि ‘डेंग्यू’ यासारख्या आजारांसोबत केली होती. याचबरोबर त्यांनी मलेरिया, डेंग्यूप्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन करावे लागणार असल्याची आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. उदयनिधी यांच्या या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता. तसेच उदयनिधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

Advertisement
Tags :

.