For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलकाता घटनेची ‘सर्वोच्च’ दखल

06:58 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोलकाता घटनेची ‘सर्वोच्च’ दखल
Advertisement

सरन्यायाधीशांसमोर उद्या सुनावणी : देशव्यापी पडसादांमुळे न्यायालयाने स्वत:हून वेधले लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, कोलकाता

कोलकाता घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज ऊग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मंगळवार, 20 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Advertisement

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील 31 वर्षीय महिला डॉक्टर 9 ऑगस्ट रोजी मृतावस्थेत आढळून आली होती. या हत्याकांडानंतर देशभरात डॉक्टरांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. तसेच देशभरातील डॉक्टरांनी या अमानवी घटनेबद्दल आवाज उठवत देशव्यापी संप पुकारल्याने आवाज बुलंद झाला होता. आता मंगळवारी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सकाळी या प्रकरणाची पहिली सुनावणी होईल. मंगळवारी सुनावणी होणाऱ्या नियोजित प्रकरणांच्या यादीत हे प्रकरण 66 व्या क्रमांकावर असले तरी, खंडपीठ प्राधान्याने सुनावणी करेल, असा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

17 ऑगस्ट रोजी देशव्यापी आक्रोश आणि वैद्यकीय समुदायाच्या संपादरम्यान या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्राच्या याचिकेत 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या लज्जास्पद घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेण्याची विनंती केली होती. तसेच 14 ऑगस्ट रोजी आरजी कार मेडिकल कॉलेजवर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्याचा आग्रहही धरला होता. याशिवाय अन्य मुद्दे उपस्थित करताना प्रकरण प्रलंबित होईपर्यंत आरजी कार मेडिकल कॉलेज आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश देण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली आहे. स्थानिक कायदा आणि अंमलबजावणी यंत्रणा हल्ला रोखण्यात आणि गुन्हेगारीच्या ठिकाणी होणारी क्रूरता पाहता हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले होते. आपल्या पत्रात त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील क्रूर हल्ल्यांच्या चिंताजनक वाढत्या घटनांचा उल्लेख केला आहे.

आरोपीची मानसिक चाचणी सुरू

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाविरोधात देशभरातील डॉक्टरांच्या आंदोलनाला 9 दिवस झाले आहेत. या प्रकरणातील आरोपी संजयची मानसिक चाचणी केली जात आहे. सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधील (सीएफएसएल) मानसशास्त्रज्ञ आणि वर्तणूक विश्लेषकांची 5 सदस्यीय टीम ही चाचणी घेत आहे. या चाचणीतून आरोपी संजयची या गंभीर गुन्ह्याबाबतची मानसिकता काय होती हे कळू शकते. तसेच घटनेची गंभीरता लक्षात घेत सखोल तपास करण्यासाठी पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट चाचणी घेण्याची तयारीही तपास यंत्रणांनी केली आहे.

लॉकेट चॅटर्जी यांना समन्स जारी

कोलकाता पोलिसांनी भाजपचे माजी खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून समन्स जारी केले आहेत. चॅटर्जी यांनी कोलकाता घटनेतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची ओळख उघड केली होती. याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याशिवाय कोलकाता पोलिसांनी टीएमसी खासदार सुखेंदू शेखर यांनाही समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांच्यावर या प्रकरणाबाबत अफवा आणि खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप आहे.

घटनास्थळी 3डी मॅपिंग

या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यापासून सीबीआयने वेगवेगळ्या माध्यमातून सर्व धागेदोरे तपासण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. रविवारी सीबीआयच्या पथकाने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये 3 डी लेझर मॅपिंगचे काम पूर्ण केले. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्ट रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. याच ऊग्णालयात 14 ऑगस्टच्या रात्री उशिरा हिंसाचार झाला होता. घटनेची गंभीरता लक्षात घेत हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. सीबीआयचे अधिकारी चौकशी पूर्ण होईपर्यंत कोलकाता येथेच तळ ठोकून राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

अन्य डॉक्टरही निशाण्यावर

महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आता सीबीआय तपासाने वेग घेतला आहे. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच अन्य तिघांचीही चौकशी करण्यात आली. माजी प्राचार्य संदीप घोष यांची सीबीआय अधिकाऱ्यांनी सलग चौथ्या दिवशी चौकशी सुरू ठेवली आहे. तसेच कोलकाता पोलिसांनी आरजी कार हॉस्पिटलचे डॉ. कुणाल सरकार आणि डॉ. सुबर्णो गोस्वामी यांना नोटीस बजावली आहे. दोन्ही डॉक्टरांवर या प्रकरणाबाबत अफवा पसरवल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पिडितेच्या मातापित्यांचीही भेट

सीबीआय अधिकाऱ्यांनी शनिवारी या प्रकरणातील पिडितेच्या मातापित्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून काही माहिती घेतली. सीबीआयकडून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील सर्व घटनाक्रम समजून घेऊन त्यानंतर चौकशीच्या मुख्य भागाला प्रारंभ करण्याची सीबीआयची योजना असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

मेडिकल कॉलेजजवळ कलम 163 लागू

कोलकाता पोलिसांनी रविवारपासून आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलजवळ भारतीय न्याय संहिताचे कलम 163 (पूर्वीचे कलम 144) लागू केले आहे. पुढील 7 दिवस (24 ऑगस्ट) आंदोलनांवर बंदी असेल, असे या आदेशात म्हटले आहे. 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास, शस्त्र बाळगणे किंवा तणाव निर्माण करणारी कोणतीही कृती करण्यास परवानगी दिली जाणार नाही. 14 ऑगस्ट रोजी झालेल्या तोडफोड आणि हिंसाचारप्रकरणी कोलकाता पोलिसांनी आणखी 2 जणांना अटक केली आहे. आतापर्यंत एकूण 32 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.

Advertisement
Tags :

.