दिल्ली वक्फ बोर्डाची याचिका ‘सर्वोच्च’ने फेटाळली
शाहदरा येथील गुरुद्वाराच्या जमिनीवर होता दावा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील शाहदरा परिसरात असलेल्या गुरुद्वाराच्या जमिनीवर मशीद असल्याचा दावा करणारी दिल्ली वक्फ बोर्डाची अपील याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. आता तेथे पूर्णपणे कार्यरत गुरुद्वारा असल्यामुळे वक्फ बोर्डाने स्वेच्छेने आपला दावा सोडायला हवा होता, असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. न्यायाधीश संजय करोल आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर यासंबंधीची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाचे अपील फेटाळल्यामुळे आता शाहदरातील ती मालमत्ता गुरुद्वाराच्या वापरात राहील आणि वक्फ बोर्डाचा आता त्यावर कोणताही दावा राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
2010 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल देत वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला होता. वक्फ बोर्डाने स्वत:च आपला दावा सिद्ध करावा, असे स्पष्ट निर्देश देताना दुसरी व्यक्ती त्याच्या मालकीची कागदपत्रे दाखवू शकली नाही, म्हणजे वक्फ बोर्डाचा खटला मजबूत करत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. शाहदरा येथे गुरुद्वारा बांधलेल्या जागेवर पूर्वी ‘मस्जिद तकिया बब्बर शाह’ नावाची जुनी मशीद होती आणि ती जमीन धार्मिक कारणांसाठी वक्फची मालमत्ता होती, असे वक्फ बोर्डाने म्हटले आहे. परंतु याविरुद्ध जमीन मालकाच्या वारसाने न्यायालयात युक्तिवाद करत ही वक्फची मालमत्ता नाही, तर ती त्यांचे पूर्वज मोहम्मद अहसन यांनी 1953 मध्ये विकली होती.