थकीत ई-चलन न भरल्यास थेट वाहन जप्ती, सर्वोच्च न्यायालयाचे कडक आदेश; पूर्ण रक्कम भरेपर्यंत ऑनलाइन सेवा गोठवा
कोल्हापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही ई-चलनाचा दंड न भरणाऱ्या मुजोर वाहनचालकांविरोधात आता सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. केवळ हजारो ई-चलन जारी करून चालणार नाही, तर आकारलेला दंड प्रत्यक्ष वसूल होणे आवश्यक आहे, असे खडसावत न्यायालयाने थकित दंड न भरणारी वाहने थेट जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच थकबाकी पूर्ण भरेपर्यंत संबंधित वाहनाशी निगडित सर्व ऑनलाईन सेवा तत्काळ गोठवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे वाहतूक शाखा आणि परिवहन विभागाची (आरटीओ) कारवाई आता आणखी तीव्र होणार आहे. थकित दंड प्रलंबित असल्यास संबंधित वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) नूतनीकरण केले जाणार नाही. अद्ययावत करणे तसेच डुप्लिकेट आरसी मिळणे, पत्ता किंवा मालकी हक्क हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेवर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे परवाने (ड्रायव्हिंग लायसन्स) नूतनीकरण न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
ना फिटनेस, ना पीयूसी; वाहन पोर्टलवर 'ब्लॅकलिस्ट'
थकित दंड असलेल्या वाहनांना कोणत्याही केंद्रातून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) दिले जाणार नाही, तसेच व्यावसायिक वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्रही रोखले जाईल, अशी सर्व वाहने परिवहन पोर्टलवर काळ्या यादीत टाकली जातील. यामुळे भविष्यात अशा वाहनांची खरेदी-विक्री करणे वाहन मालकांना अशक्य होणार आहे.
जिल्ह्यात १३ कोटींहून अधिक दंड प्रलंबित
जिल्ह्यात दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांकडे तब्बल १३ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा ई-चलन दंड थकीत आहे. यामध्ये सर्वाधिक दंड चारचाकी वाहनांकडे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
