घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
शिक्षेला स्थगिती देण्यासंबंधीची याचिका फेटाळली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
न्यायाधीश असल्याचे भासवून फोन केल्याबद्दल आणि न्यायिक अधिकाऱ्यावर दबाव आणल्याबद्दल दोषी ठरलेल्या घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने घोटाळेबाज सुकेशची त्याच्या शिक्षेवर आणि दोषसिद्धीवर स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाचा आदेश सदोष नव्हता असे स्पष्ट करत सुकेशवरील इतर खटल्यांची सुनावणी कायद्यानुसार आणि त्या त्या प्रकरणातील तथ्यांच्या आधारे सुरू राहिली पाहिजे, असे न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
हे संपूर्ण प्रकरण 2017 मधील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाशी संबंधित आहे. आरोपानुसार, पोलीस कोठडीत असताना सुकेशने एका हवालदाराचा मोबाईल फोन मिळवत सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा खासगी सचिव असल्याचे भासवून आणि नंतर स्वत: न्यायाधीश असल्याचे भासवून एका न्यायिक अधिकाऱ्याशी संपर्क साधला. यावेळी त्याने आपल्या प्रकरणात दिलासा आणि जामीन मिळवण्यासाठी एका न्यायिक अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.
